अदिती गोपीचंद स्वामी (१५ जून २००६, सातारा) ही महाराष्ट्रातील एक तिरंदाज आहे. २०२३ मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून ती वरिष्ठ पातळीवरील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली. [१]त्याबरोबरच, जागतिक करंडक स्पर्धेत (२००६ नंतर) सुवर्ण पदक मिळवणारी ती सर्वांत लहान वयाची (१७ वर्षे) खेळाडू ठरली.
याच स्पर्धेत तिने ज्योती सुरेखा वेण्णम आणि परनीत कौर यांच्या साथीने कंपाऊंड तिरंदाजी सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. अशी कामगिरी करणारा हा पहिला भारतीय संघ ठरला.[२]
२०२३ मध्ये जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत तिने वैयक्तिक आणि सांघिक सुवर्ण पदक मिळवले.
चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये तिने ज्योती सुरेखा वेण्णम आणि परनीत कौर यांच्या साथीने कंपाऊंड तिरंदाजी सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. तसेच याच स्पर्धेत वैयक्तिक कांस्य पदक मिळवले.[३]
अदिती मूळची सातारा जिल्ह्यातील शेरेवाडी गावाची असून सध्या साताऱ्यातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात शिकत आहे.
प्रशिक्षण प्रवीण सावंत यांच्या सातारा येथील दृष्टी तिरंदाजी अकादमीमध्ये तिने वयाच्या दहाव्या वर्षी प्रवेश घेतला आणि प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.[४]== संदर्भ आणि नोंदी ==