अष्टविनायक

अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.[] पश्चिम महाराष्ट्रकोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.[] महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.

श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते.[] महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत.[] या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. या सर्व गणपतींची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -

मोरगांव

[संपादन]

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर आहे.[] गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली होती. त्यामुळे त्याने श्री मोरयाना “हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील” असा आशीर्वाद दिला आणि तेव्हा पासून, 'मंगलमूर्ती मोरया' हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणले जाते. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे.[] प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हणले जाते.

जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हेरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे.[] या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले आहे.

थेऊर

[संपादन]
मुख्य लेख: चिंतामणी (थेऊर)

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणि महाराज देव यांनी सुमारें ४०,००० रु. खर्चून है गणमतिमंदिर बांधले. चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्रीधरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली आहे. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनीं थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य सभामंडप श्रीचरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढविला. त्यानंतर हरीपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयांची शोभा व भव्यता वाढविली आहे. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओवऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला.[] माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे.

श्रीचिंतामणींची मूर्ती भव्य, पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरमुखी असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुखी आहे. देवालयाचा महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर तीन बाजूंना तीन कोनाड्यात तीन छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत. श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असणाऱ्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्गल पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लम्बोदरांचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजीअप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजां कडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्रीचिंतामणींच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षीनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले. त्या स्थानी कदंब वृक्ष नावाने आजही भव्य वृक्ष पाहायला मिळतो.

थेऊर हे गाव, पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे.

सिद्धटेक

[संपादन]

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती.[] उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे.[]

हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जातांना डाव्या बाजूला शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा १५ फूट उंच व १० फूट रूंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्‍या मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. सभामंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे. राशीन येथे पण जगदंबा देवी चे प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे जगप्रसिद्ध दगडाच्या हलत्या दीपमाळा प्रसिद्ध आहे.दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते, ती ओलांडायला होड्या असतं मात्र सध्या पूल झाला आहे.

रांजणगाव

[संपादन]

अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगाव ला आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात.[१०] हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.[११]

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की, त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोकपृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हणले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.

हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

मुख्य लेख: विघ्नहर (ओझर)

अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्र्वर हा सातवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते.[१२] श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.[१३]

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्रखोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

लेण्याद्री

[संपादन]

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे.[१४][१५] श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.[१६]

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

मुख्य लेख: वरदविनायक (महड)

महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.[१७]

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.[१८]

पाली

[संपादन]

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे.[१९] या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे.[२०] मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

यात्रा

[संपादन]

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहिल्यानगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.[२१]

हे सुद्धा पहा

[संपादन]
अष्टविनायक
मोरेश्वरसिद्धिविनायकबल्लाळेश्वरवरदविनायकगिरिजात्मजचिंतामणीविघ्नहरमहागणपती

मंदिरे

[संपादन]

अष्टविनायकांची आठ मंदिरे/मूर्ती त्यांच्या धार्मिक क्रमानुसार आहेत:

अष्टविनायक मंदिरे
क्रमांक मंदिर स्थान
मोरेश्र्वर मंदिर मोरगाव, पुणे जिल्हा
सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक, अहमदनगर जिल्हा
बल्लाळेश्वर मंदिर पाली, रायगड जिल्हा
वरदविनायक मंदिर[२२] महड, रायगड जिल्हा
चिंतामणी मंदिर थेऊर, पुणे जिल्हा
गिरीजात्मज मंदिर लेण्याद्री, पुणे जिल्हा
विघ्नेश्वर मंदिर ओझर, पुणे जिल्हा
महागणपती मंदिर रांजणगाव, पुणे जिल्हा

विदर्भातील आठ गणपती

[संपादन]

या अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भात देखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत. या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ असे म्हणले जाते.

  1. टेकडी गणपती, नागपूर (जिल्हा-नागपूर)
  2. शमी विघ्नेश, आदासा (जिल्हा-नागपूर)
  3. अष्टदशभुज, रामटेक (जिल्हा-नागपूर)
  4. भृशुंड, मेंढा (जिल्हा-भंडारा)
  5. सर्वतोभद्र, पवनी (जिल्हा-भंडारा)
  6. सिद्धिविनायक, केळझर (जिल्हा-वर्धा)
  7. चिंतामणी , कळंब (जिल्हा-यवतमाळ)
  8. वरदविनायक, भद्रावती (जिल्हा-चंद्रपूर)

प्रसिद्ध गणपती मंदिरे

[संपादन]

येथे निसर्गरम्य वातावरण व पाण्याची भरपूर सोय आहे.

  • बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या गावात चालुक्याकालींन काळात बांधलेले 12 ज्योतिर्लिंगाची 12 मंदिरे अष्टविनायकाची आठ मंदिरे आहेत पैकी तुरळकच मंदिरे आज पाहायला मिळतात, या इतिहासाकडे पुरातत्त्व विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे असे अर्जुन फड यांच्या लेखातून स्पष्ट झाल्याचे दिसून येते[ संदर्भ हवा ]

अष्टविनायक चित्रदालन

[संपादन]

श्री मयुरेश्वर, मोरगाव

श्री सिद्धीविनायक, सिद्धटेक

श्री बल्लाळेश्वर, पाली येथील मंदिर

श्री वरदविनायक, महड

श्री चिंतामणी, थेऊर

श्री गिरीजात्मज, लेण्याद्री

श्री विघ्नेश्वर विनायक, ओझर

श्री महागणपती, रांजणगाव

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Swami, Dr Manjusha Sanjay. Saptarang - TB. Saraswati House Pvt Ltd. ISBN 9789351991892.
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  3. ^ Sanskar (2018-11-09). Ashtavinayak (इंग्रजी भाषेत). Amazon Digital Services LLC - Kdp Print Us. ISBN 9781731074256.
  4. ^ Khole, Gajānana Śã (1992). Om̐kāra Gaṇeśa, Purāṇokta 21 Gaṇapatī, pūjā-utsava, upāsanā, ārādhanā. Indrāyaṇī Sāhitya.
  5. ^ Yangalwar, Pro Vijay (2013-09-09). Shree Ganesh Mahatma / Nachiket Prakashan: श्री गणेश माहात्म. Nachiket Prakashan.
  6. ^ Gunaji, Milind (2010). Offbeat Tracks in Maharashtra (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7991-578-3.
  7. ^ Grewal; Royina (2007). Deva Tuchi Ganesha (Marathi). Penguin Books India. ISBN 978-0-14-400075-3.
  8. ^ Maharashtra General Knowledge (इंग्रजी भाषेत). Upkar Prakashan. ISBN 9789350133576.
  9. ^ Bhāratīya sãskr̥tikośa. Bhāratīya Sā̃skr̥tikośa Maṇḍaḷa. 1962.
  10. ^ 121 Gaṇeśa darśana: sarvapūjya sarvādipūjya Bhagavāna Śrī Gaṇeśāvarīla sakhola va māhitīpūrṇa grantha. Sañjanā Pablikeśana, Śrī Gaṇeśa Grāmastha Sevā, Maṇḍaḷa, Borivilīcyā Vidyamāne. 1996.
  11. ^ Balasubramanian, Lalitha (2017-08-30). Temples in Maharashtra: A Travel Guide (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-947697-88-1.
  12. ^ Gunaji, Milind (2003). Offbeat Tracks in Maharashtra (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 9788171546695.
  13. ^ Swami, Dr Manjusha Sanjay. Saptarang - TB. New Saraswati House India Pvt Ltd. ISBN 978-93-5199-189-2.
  14. ^ Gunaji, Milind (2003). Offbeat Tracks in Maharashtra (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 9788171546695.
  15. ^ Bhāratīya sãskr̥tikośa. Bhāratīya Sã̄skr̥tikośa Maṇḍaḷa. 1962.
  16. ^ Gunaji, Milind (2010). Mystical, Magical Maharashtra (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7991-445-8.
  17. ^ Gadgil, Amarendra Laxman (1981). Śrīgaṇeśa kośa: bhāvika bhakta, upāsaka, āṇi abhyāsaka aśā sarvã̄sāṭhĩ̄ Gaṇeśa daivatavishayaka sarva jñānācā saṅgrāhya sādhana-grantha. Śrīrāma Buka Ejansī.
  18. ^ GANGASHETTY, RAMESH (2019-10-30). THIRTHA YATRA: A GUIDE TO HOLY TEMPLES AND THIRTHA KSHETRAS IN INDIA (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-68466-134-3.
  19. ^ Maharashtra, Land and Its People (इंग्रजी भाषेत). Gazetteers Department, Government of Maharashtra. 2009.
  20. ^ Abhinava marathi jna.
  21. ^ Vājapeyi, Mathurāpati (1988). Gīta-Gaṇeśa-kāvyam (हिंदी भाषेत). Prācya-Niketanam, Br̥jamohana-Biṛalā-Śodha-Kendram.
  22. ^ "संग्रहित प्रत". 2020-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-27 रोजी पाहिले.