कण्णियार कली (मल्याळम: കണ്യാർകളി) हा केरळ राज्यातील मंदिर प्रांगणात सादर केला जाणारा नृत्यप्रकार आहे. पल्लकड जिल्ह्यातील अलाथुर आणि चित्तूर गावांमधील मंदिरात हे धार्मिक लोकनृत्य सादर केले जाते.[१] एप्रिल आणि मे महिन्यात गावातील विष्णू देवतेच्या पूजनाच्या निमित्ताने हे नृत्य सादर केले जाते.[२] नायर समूहाच्या कृषी उत्सवाशी निगडीत अशी ही संकल्पना आहे.[३]
हे नृत्य सादर करण्याची सुरुवात रात्री केली जाते आणि पहाटेपर्यंत हे नृत्य सुरू राहते. काही गावांमध्ये तीन रात्री हा उत्सव चालू राहतो. वतकल्ली म्हणजे समूहाने गोल नृत्य करणे. पहिल्या रात्री कनियार समूहाचे पुरुष मंदिरात एकत्र जमतात आणि वाद्यांच्या तालावर या नृत्याची सुरुवात करतात.[४] प्रत्येक जमातीच्या पद्धतीनुसार नृत्यामध्ये वैविध्य आढळते. शौर्य दाखविणारी काही नृत्य काही आदिवासी जमाती सादर करतात. काही नृत्य मंद लयीत आणि संथ हालचालीत सादर केली जातात. काही सादरीकरणात विनोद निर्मिती केली जाते. या सादरीकरण प्रकाराला पूरत्तू संबोधले जाते. या नृत्यासाठी लाकडी व्यासपीठ तयार केले जाते त्याला पंडाल असे म्हणतात. मंदिराच्या प्रांगणात मध्यभागी हे व्यासपीठ मांडले जाते. याला नऊ खांब जोडले असतात. व्यासपीठाच्या मध्यभागी नंदादीप लावलेला असतो. व्यासपीठाच्या मध्यभागी गायक आणि वादक बसतात आणि नृत्य करणारे कलाकार भोवती गोलाकार नृत्य सादर करतात. यासाठी गायली जाणारी गीते मल्याळी भाषेत असतात आणि काहीवेळा त्यावर तमिळ भाषेचा प्रभाव जाणवतो. पुरुषांच्या जोडीने महिलाही नृत्यात सहभाग घेतात.[५]