ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे तथा जी.आय.पी. ही मध्य आणि पश्चिम भारतातील रेल्वे कंपनी होती. मुंबईतील बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस तथा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना १ ऑगस्ट, १८४९ रोजी झाली.
ब्रिटिश संसदेच्या कायद्याने अस्तित्वात आलेल्या या कंपनीला ५०,००० पाउंडचे भांडवल उभारण्याची परवानगी होती. २१ ऑगस्ट, १८४९ रोजी जी.आय.पी. आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार जी.आय.पी.ला मुंबईपासून खानदेशाच्या दिशेस ५६ किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट मिळाले. हा मार्ग भारतातील इतर ब्रिटिश प्रांतांना जोडणाऱ्या अपेक्षित रेल्वेमार्गाचा भाग होणार होता. ईस्ट इंडिया कंपनीने जेम्स जॉन बर्कली याला मुख्य अभियंता तर सी.बी. कार आणि आर.डब्ल्यू. ग्रॅहाम यांना मदतनीस अभियंता म्हणून नेमले.[१][२] मुंबई आणि ठाणे यांच्यामधील हा रेल्वेमार्ग भारतातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वेमार्ग होता. १८७०पर्यंत जी.आय.पी.च्या रेल्वेमार्गांचे जाळे मुंबईपासून पुणे, सोलापूर मार्गे वाडी; ईगतपुरी, जळगांव मार्गे नागपूर; खंडवा, जबलपूर, अलाहाबाद मार्गे कोलकाता, आग्रा आणि दिल्ली पर्यंत पसरले होते. १ जुलै, १९२५ रोजी भारतातील ब्रिटिश सरकारने जी.आय.पी. कंपनी बरखास्त केली व रेल्वेमार्गांचा कारभार स्वतःच्या हाती घेतला.[३]
५ नोव्हेंबर, १९५१ रोजी जी.आय.पी.चे सगळे रेल्वेमार्ग सेंट्रल रेल्वे मध्ये विलीन करण्यात आले.