?नांदूर मध्यमेश्वर महाराष्ट्र • भारत | |
— अभयारण्य — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | नाशिक |
तालुका/के | निफाड |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४२२३०३ • MH १५ |
नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते.[१] या अभयारण्याचे क्षेत्र सुमारे १००.१२ चौ. कि. मी. एवढे आहे.
१९९९ साली गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर बंधारा बांधण्यात आला. त्यातील पाणी पुढे दोन्ही बाजूंच्या कालव्यांद्वारे सोडण्यात येऊ लागले. त्यामुळे गाळ, दलदल, गाळ साठून नदीपात्रात उंचवटे अशी भूरूपे तयार झाली. पक्ष्यांना खाद्य म्हणून आवश्यक असलेले मासे, शैवाल, दलदलीतील कीटक येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे येथे पक्ष्यांची संख्या वाढत गेली. पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात येथे सुमारे ३५००० पक्षी आढळत असल्याची नोंद आहे. १९८२ मध्ये ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉ. डॉ. सालीम अली यांनी नांदूर मधमेश्वरला भेट दिली आणि "हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे" असे उद्गार काढले आणि सरकारला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती केली.[२] पुढे १९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला.[३]
येथे मुग्धबलाक (ओपन बिल्ड स्टॉर्क), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), पाणकावळा, काळे कुदळे, खंडया, गाय बगळे, जांभळी पाणकोंबडी, राखी बगळा, पर्पल हेरॉन, युरेशियन कूट, हळद कुंकू बदक हे स्थानिक पाणपक्षी आढळतात. या जलाशयाच्या परिसरात जांभळी पाणकोंबडी मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने तिला नांदूर मध्यमेश्वरची राणी म्हणले जाते.[२]
तसेच येथे टिल, पोचार्ड, विजन, गडवाल, थापट्या, पिनटेल, गारगनी, कॉटन पिग्मी गूज ही विविध प्रकारची बदके हिवाळ्यात स्थलांतर करून येतात. [४] त्याशिवाय गॉडविट, सॅंड पायपर (तुतवार), क्रेक, रफ, स्मॉल प्रॅटीनकोल हे दलदलीत आढळणारे स्थलांतरीत पक्षीसुद्धा येतात.
येथे दरवर्षी पक्षीमित्र संघटना आणि बी.एन.एच.एस. यांच्या वतीने जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पक्षीगणना केली जाते.[२] पक्षी निरीक्षकांच्या नोंदीनुसार येथे सुमारे २४० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात.[३]
यापूर्वी झालेल्या पक्षी गणनेच्या नोंदी[२]
वर्ष | प्रजाती | एकूण संख्या |
२००७ | ६३ | ३८६९९ |
२००८ | ५५ | २५७०५ |
२००९ | ४१ | १३१८८ |
२०१० | ४९ | ३३०३७ |
२०११ | ५१ | १४५५१ |
२०१२ | ५६ | २२६५२ |
२०१३ | ५९ | ४१८१९ |
२०१४ | ४५ | १३७४९ |
अभयारण्य परिसरात कोल्हा, मुंगूस, उदमांजर, बिबटे, लांडगे, विविध प्रकारचे साप इ. प्राणी आढळतात. येथील जलाशयात सुमारे २४ जातींचे मासे आहेत.
पक्षी निरीक्षकांसाठी चापडगाव येथे दुर्बिण, स्पॉटिंग स्कोप, फिल्ड गाईड (पक्षी मार्गदर्शक पुस्तक), मार्गदर्शक यांची सोय करण्यात आलेली आहे. जलाशयाच्या काठाने निरीक्षण मनोरे उभारण्यात आलेले आहेत.
मांजरगाव येथेसुद्धा निरीक्षण मनोरे उभारण्यात आलेला आहे. खाणगाव थडी येथे निसर्ग निर्वाचन केंद्र, वन उद्यान, वनविश्रामगृह इ. सुविधा उपलब्ध आहेत.
येथे मोठ्या प्रमाणावर जैव विविधता आढळत असल्यामुळे आणि येथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या आणि स्थलांतराच्या काळात एकूण पक्ष्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्यामुळे जागतिकदृष्ट्या हे महत्त्वाचे स्थळ आहे. २०२० मध्ये या ठिकाणाला जागतिक रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली. रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट होणारे हे महाराष्ट्रातील पहिले ठिकाण आहे. या स्थळाने रामसर यादीत समावेश होण्यासाठीचे निकष क्र.२ (जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रजातींचे अस्तित्त्व), निकष क्र. ३ (जैवविविधता कायम ठेवणे, धोक्याच्या स्थितीत असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांना आसरा देणे), निकष क्र. ७ (स्थानिक माशांच्या प्रजातींची लक्षणीय संख्या), निकष क्र. ८ (माशांसाठी अन्नाचा महत्त्वाचा स्रोत, अंडी घालण्याची जागा आणि मासे ज्यावर अवलंबून आहेत असा स्थलांतराचा मार्ग) पूर्ण केल्यामुळे त्याला यादीत स्थान मिळाले.[५]
नांदूर मध्यमेश्वर येथे जाण्यासाठी नाशिकहून एक-सव्वा तास, सिन्नरहून पाऊण तास, तर निफाडहून वीस मिनिटे लागतात.