पावनखिंड (मराठी चित्रपट) | |
---|---|
चित्र:पावनखिंड.jpg | |
दिग्दर्शन | दिगपाल लांजेकर |
निर्मिती |
अजय आरेकर अनिरुद्ध आरेकर भाऊसाहेब आरेकर |
कथा | दिगपाल लांजेकर |
प्रमुख कलाकार |
चिन्मय मांडलेकर मृणाल कुलकर्णी समीर धर्माधिकारी अजय पुरकर अंकित मोहन |
छाया | अमोल गोले |
संगीत | देवदत्त मनीषा बाजी |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | फेब्रुवारी १८ २०२२ |
वितरक | ए ए फिल्म्स |
अवधी | २ तास ३३ मिनिटे |
एकूण उत्पन्न | ६० कोटी |
पावनखिंड (इंग्रजी: Pawankhind ) हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, ए.ए. फिल्म्स (A A Films) प्रस्तुत आणि अॅलमंड्स क्रिएशन्स (Almonds Creations) निर्मित मराठी भाषेतील ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपट आहे. मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास 'पावनखिंड' सिनेमात दाखवला आहे.
'पावनखिंड' सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १८ फेब्रुवारी २०२२ मध्ये हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे.[१]
दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शिव चरित्रावरील आधरित आठ चित्रपटांच्या मालिकेतील फर्जंद आणि फत्तेशिकस्त या दोन चित्रपटा नंतर बाजीप्रभू देशपांडे व बांदल सेनेच्या घोडखिंडीतील पराक्रमावर हा तिसरा चित्रपट.
आदिलशाहीचा सरदार सिद्दी जौहरने शिवाजी महाराजांस साखळदंडात बांधून विजापुरास नेण्यासाठी पन्हाळगढास वेढा देऊन महाराज व महाराजांच्या सैन्यास गडावर कोंडल्यानंतर, वेढ्यातुन बाहेर निघण्यासाठी शिवाजी महाराज विशाळगढाकडे निघतात तेव्हा शिवाजी महाराज हे विशाळगढावर सुखरूप पोहचवण्यासाठी बाजीप्रभु देशपांडे आणि ३०० बांदल सैनिकांचा पराक्रम ह्या चित्रपटात दाखवला आहे. १३ जुलै १६६० मध्ये कोल्हापुरजवळील विशाळगढाच्या परिसरातील घोडखिंडीतील लढाईतील मावाळ्यांचे शोर्य या चित्रपटाच्या माध्यमातून आपणास पाहण्यास मिळते.
चित्रपटाचा संगीत देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीतबद्ध केला असून दिग्पाल लांजेकर यांनी गीते लिहिली आहेत. हरिदास शिंदे व अवधूत गांधी यांनी गायलेल्या "युगत मंडळी" या गाण्याचा व्हिडिओ डिसेंबर २०२१ मध्ये रिलीज झाला.[२]
गाणे | |||
---|---|---|---|
क्र. | शीर्षक | गायक | अवधी |
१. | "युगत मांडली[३]" | अवधूत गांधी ,हरिदास शिंदे | ३:१० |
२. | "राजं आलं[४]" | अवधूत गुप्ते | ३:२२ |
३. | "श्वासात राजं ध्यासात राजं[५]" | देवदत्त मनीषा बाजी | २:०२ |
४. | "रणी निघता शूर" | देवदत्त मनीषा बाजी | ४:२३ |
एकूण अवधी: |
१२ः४७ |
'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' नंतर १५ नोव्हेंबर २०१९ रोजी 'जंगजौहर' या ऐतिहासिक चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आला होता. १० फेब्रुवारी २०२० ला जंगजौहर या चित्रपटाचा किल्ले रायगडावर ढोल-ताशांच्या गजरात व मंत्रोच्चाराच्या जयघोषात मुहूर्त पार पडला.[६] १९ मार्च २०२० ला चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले.[७] फेब्रुवारी २०२१ मध्ये चित्रपटाचं नाव बदलून पावनखिंड करण्यात आलं.[८][९]
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर, अनिरुद्ध् आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अॅलमंड्स क्रिएशन्स (Almonds Creations) च्या बॅनरखाली निर्मित तर ए.ए. फिल्म्स (A A Films) च्या बॅनरखाली प्रस्तुत करण्यात आला.
पावनखिंड हा चित्रपट १० जून २०२१ लाच प्रदर्शित होणार होता.[१०] परंतु कोरोना महामारीमुळे प्रदर्शन हे पुढे ढकलण्यात आले. नंतर हा चित्रपट ३१ डिसेंबर २०२१ ला प्रदर्शित करण्याचे ठरवले असता ओमिक्रॉन या कोरोना विषाणूमुळे दुसऱ्यांदा ह्या चित्रपटाची प्रदर्शन तारीख बदलण्यात आली.[११][१२] अखेर हा चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला.
पावनखिंडला समीक्षकांची वाहवा मिळाली. द टाईम्स ऑफ इंडिया मधील मिहिर भानगे यांनी चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार्स, आणि असे म्हणले की "पावनखिंड कथाकथनात उत्कृष्ट आहे, तांत्रिक बाबी जरी चांगल्या असल्या तरी अधिक चांगल्या केल्या जाऊ शकल्या असत्या. काही महत्त्वाच्या दृश्यांमध्ये पार्श्वसंगीत संवादांवर मात करते, काही साहस दृश्यांमध्ये कट करण्यात अयशस्वी. तरिही, चित्रपटाच्या माध्यमातून सर्व काही सांगितले आणि केले, संपूर्ण टीमने ह्यला मोठ्या पडद्यावरील अनुभव बनवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला आहे. कदाचित मोठ्या बजेटसह, लांजेकरांच्या मालिकेच्या पुढील चित्रपटांमध्ये या गोष्टीं सुधारल्या जातील."[१३] Cinestaan.com मधील श्रीराम अय्यंगार यांनी लिहिले की "नक्कीच, नाटकाचा स्तर अधिक उंचावला आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की चित्रपट बहुसंख्यांक जनांच्या पूर्वाग्रहामुळे रंगला आहे. तरीही लोकनाट्यकारांची ती नेहमीचीच शैली होती. ते प्रेक्षकांना अनुरूप होईल अशी टोन बदलू शकत होते. सिनेमा वेगळा नसल्याचा दावा करू शकतो. शेवटच्या अॅक्शन सीक्वेन्समध्ये असे काही क्षण आहेत जेव्हा व्हीएफएक्स मधल्या चुका दिसतात, परंतु त्या कथेला कोणत्याही प्रकारे अडथळा आणत नाहीत."[१४] महाराष्ट्र टाइम्सचे कल्पेश कुबाल लिहितात की "तांत्रिक बाजू काहीशी ढासळलेली दिसते; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. चित्रपटाच्या संपूर्ण कथेत दिग्दर्शकाने विविध शूरवीरांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे."[१५] "दिग्दर्शक आणि कलाकारांची मेहनत पडद्यावर पाहायला मिळते. एक अभूतपूर्व इतिहास अनुभवण्यासाठी तुम्ही या चित्रपटगृहाला भेट द्यावी आणि एकदा तरी तो पहावा" अशी लोकमतच्या समीक्षांची प्रतिक्रिया आहे.[१६]
महाराष्ट्रामध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक सिनेमागृहासमोर हाऊसफुलचे फलक ही पाहण्यास मिळाले. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रयोगांची संख्या देखील वाढवण्यात आली होती.[१७] पावनखिंड या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यावर पहिल्या आठवड्यात ₹१२.१७ कोटी कमावले. १६ मार्च २०२२ पर्यंत, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹३९.६५ कोटींची कमाई केली आहे.[१८]