मकि-इ (蒔絵 शब्दश: अर्थ - शिंपडलेले चित्र (किंवा डिझाइन) ) हे जपानी लाखेचे सजावटीचे तंत्र आहे. यामध्ये लाखेच्या भांड्यांवर लाखेने चित्रे, नमुने आणि अक्षरे रेखाटली जातात आणि नंतर सोन्याच्या किंवा चांदीसारख्या धातूची पावडर त्यावर शिंपडली जाते. मकि-इ एक मिश्रित शब्द आहे. या शब्दातील मकिचा ज्याचा अर्थ शिंपडणे आणि "इ" म्हणजे चित्र किंवा रचना असा आहे. या सजावटीच्या तंत्राने बनवलेल्या लाखेच्या भांड्यासाठी देखील हा शब्द वापरला जातो. मकि-ई हा शब्द प्रथम हियन कालावधीत वापरल्याचे दिसून येते.[१]
हे तंत्र जपानी लाखेच्या सजावटमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे तंत्र आहे. मकि-इ हे तंत्र इतर तंत्रांसहीत एकत्रित करून वापरले जाते. इतर तंत्रे उदा. रडेन' (螺鈿 ), यात शेलफिशचा नॅक्रेस लेयर एम्बेड केला जातो किंवा लाखेमध्ये पेस्ट केला जातो. झोगन (象嵌 ) यात लेयर लाखेमध्ये धातू किंवा हस्तिदंती एम्बेड केली जाते आणि चिनकिन (沈金 ) यात सोन्याचे पान किंवा सोन्याची पावडर पोकळीत एम्बेड केली जाते.[१]
विविध रंग आणि पोत तयार करण्यासाठी, मकि-इ कलाकार सोने, चांदी, तांबे, पितळ, शिसे, ॲल्युमिनियम, प्लॅटिनम आणि पेवटर तसेच त्यांच्या मिश्र धातुंसह विविध धातूंच्या पावडरचा वापर करतात. पावडर शिंपडण्यासाठी आणि बारीक रेषा काढण्यासाठी बांबूच्या नळ्या आणि विविध आकाराचे मऊ ब्रश वापरले जातात. मकि-इ तयार करण्यासाठी अत्यंत कुशल कारागिराची आवश्यकता असते. तरुण कलाकार कौशल्य विकसित करण्यासाठी बरीच वर्षे काम करतात आणि शेवटी मकि-इ मास्टर्स बनतात. कोअमि डोचो (१४१० ते १४७८) हे या विशिष्ट कामांशी जोडलेले पहिले मकि-इ मास्टर होते. त्यांच्या मकि-इ मध्ये विविध जपानी समकालीन चित्रकारांच्या रचना वापरल्या गेल्या होत्या. कोआमि आणि दुसरा मकि-इ मास्टर, इगारशी शिनसाई, जपानच्या इतिहासातील लाख बनविण्याच्या दोन प्रमुख शाळांचे प्रवर्तक होते.
मकि-इ बनवण्याच्या प्रक्रियेचे वर्गीकरण ढोबळपणे ३ प्रकारात होते. हिरा मकि-इ (平蒔絵), तोगीदाशी मकि-इ (研出蒔絵) आणि टाका मकि-इ (高蒔絵) या तीन तंत्रांमध्ये वर्गीकरण केले आहे.[१][२] जपानमध्ये, ही तीन तंत्रे आणि शिशियाई तोगिदाशी मकि-इ (肉合研出蒔絵), जे तोगीदाशी मकि-इ आणि टाका मकि-इ यांचे मिश्रण आहे, मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. या मकि-इ प्रक्रिया सामान्य रोगण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुरू केल्या जातात. दुस-या शब्दात सांगायचे तर, लाकूड किंवा कागदाला लाकूड किंवा ब्रश वापरून लाखेने लेप करणे, ते कोरडे करणे आणि पॉलिश करणे यासारख्या अनेक कामांची पुनरावृत्ती करून लाखेचा जाड पाया तयार करणे आवश्यक असते.[३]
यात प्राथमिक स्केच, ओकिमे, काढले जाते. कागदावर मूळ चित्र काढल्यानंतर पातळ वशि लावण्यात येते आणि बाह्यरेखा लाखेने रंगवली जाते. आणि नंतर हस्तांतरित करण्यासाठी लाखेच्या पृष्ठभागावर ते चित्र दाबले जाते. चित्र किंवा नमुना साधा सोपा असल्यास, ही प्रक्रिया वगळली जाऊ शकते. पुढची पायरी, जिगाकि आहे. ही प्रक्रिया धातुची पावडर शिंपडण्यापूर्वी केली जाते. ज्या ठिकाणी धातूची पावडर शिंपडायची असते त्या ठिकाणी लाख लावली जाते आणि ती चिकटवण्यासाठी वापरली जाते. मग, फुनमकि प्रक्रिया केली जाते. यात पक्ष्यांच्या पंखांच्या शाफ्ट किंवा बांबूची नळी वापरून धातूची पावडर शिंपडली जाते. पुढील प्रक्रियेत, धातुच्या पावडरचे संरक्षण करण्यासाठी धातुच्या पावडरच्या वर लाख लावली जाते आणि नंतर लाख सुकवली जाते. प्रथम पॉलिशिंग पुढील फुनतोगि प्रक्रियेमध्ये केली हाते. यात लाखेमध्ये एम्बेड केलेल्या धातुच्या पावडरसह केवळ धातूच्या पावडरचा पृष्ठभाग उघड करण्यासाठी लाखेला किंचित पॉलिश केले जाते. त्यानंतरच्या पॉलिशिंग प्रक्रियेत, संपूर्ण लाखेची भांडी वेगवेगळ्या कणांच्या आकाराच्या ऍब्रेसिव्हने पॉलिश केली जातात. याव्यतिरिक्त, प्रत्येक पॉलिशिंग प्रक्रियेच्या मध्यभागी, सुरियुरुशी घातला जातो, ज्यामध्ये लाहाच्या भांड्यावर लाख घासणे आणि ते कोरडे करणे अशा प्रक्रियांची मालिकेची पुनरावृत्ती होत राहते. अशाप्रकारे चकचकीत मकि-इ या गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून पूर्ण होते. [३] मकि-इ बनवण्याच्या पद्धतींमध्ये सर्वात सोप्पी पद्धत तोगिदाशी मकि-इ आहे. ही पद्धत हियन कालावधीच्या उत्तरार्धात विकसित झाली होती. आणि कामकुरा काळात पूर्ण झाली कारण यासाठी धातूच्या पावडरचे कण अधिक बारीक करणे आवश्यक होते. हे तंत्र अझुची-मोमोयामा काळात जास्त प्रचलित होते कारण या काळात मकि-इचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आवश्यक होते.[४][२]
तोगीदशी मकि-इ आणि हिरा मकि-इ मध्ये फंगटामेपर्यंत समान प्रक्रिया असते जिथे ते धातूच्या पावडरचे संरक्षण करण्यासाठी लाख लावतात. तथापि, त्यानंतरच्या प्रक्रिया वेगळ्या आहेत. तोगिदाशी माकी-ई नुरीकोमी नावाची प्रक्रिया वापरतात, यामध्ये चित्रे आणि नमुन्यांसह संपूर्ण लाखेची भांडी काळ्या लाखेने लिपतात. लाख कोरडी झाल्यानंतर, धातूच्या पावडरची पृष्ठभाग उघड होईपर्यंत पॉलिश केली जातात. त्यानंतर, हे हिरा माकी-ई सारखेच आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या कणांच्या आकाराच्या ब्रशनी पॉलिश केले जाते आणि लाखेला घासून वाळवले जाते. परंतु प्रत्येक प्रक्रियेची पद्धत वेगळी असते. पॅटर्नसह संपूर्ण पृष्ठभाग लाखेने लेपतात आणि नंतर पॉलिश केल्यामुळे, पॅटर्नचा पृष्ठभाग आणि पार्श्वभूमी गुळगुळीत होते आणि हिरा माकी-ई पेक्षा धातूची पावडर काढणे कठीण असते. ही पद्धत हियन काळात विकसित झाली. याच काळात हे पूर्णपणे विकसित झालेले एक तंत्र होते. या तंत्राचा वापर हियन कालावधीच्या उत्तरार्धापर्यंत माकी-ई बनवण्याची मुख्य प्रक्रिया झाली होती. यावेळेस सोने आणि चांदीच्या पावडरचे शुद्धीकरण तंत्र विकसित नव्हते आणि यात वापरले जाणारे कण खडबडीत असायचे.[५] शोसोइन येथे ठेवलेल्या नारा कालखंडातील तलवारीच्या खपली या तंत्रासारखेच असणारे माक्किरुसाकु (末金鏤作) नावाचे तंत्र वापरून केले जात होते. असे मानतात की जपानी माकी-ईची सुरुवात नारा काळात झाली.[६][२]