रम्मन उत्सव हे गढवाल (उत्तराखंड) मधील एक विधीनाट्य आणि उत्सव आहे.[१] युनेस्कोच्य सांस्कृतिक वारसा यादीत याचा समावेश झालेला आहे.[२]
दरवर्षी एप्रिल महिन्यात सालुर आणि दुंगरा या दोन गावात हा धार्मिक उत्सव संपन्न होतो.भूमियल या स्थानिक रक्षक लोकदेवतेशी संबंधित हा उत्सव आहे.[३] बैसाखी उत्सवाच्या दिवशी गावातील पुजारी या उत्सवाची तारीख जाहीर करतात. बैसाखी दिवशी भूमियल देवतेची रथातून मिरवणूक काढली जाते.दुसऱ्या दिवशी नागरिक आपल्या शेतातील धान्याच्या लोंब्या देवतेला अर्पण करतात. दहा दिवस रामायण या धार्मिक ग्रंथातील विषयांशी संबंधित नृत्य आणि नाट्य सादर केले जातात. सोहळ्यात धार्मिक विधी केले जातात ज्यामध्ये रामायणातील श्लोकांचे पठण होते, लोकगीते आणि पारंपरिक नृत्य सादर केली जातात. मुखवटे घालून केलेले नृत्य हे याचे एक वैशिष्ट्य आहे.[४] या उत्सवाचे आयोजन गावातील लोक करतात. यामध्ये गावातील विविध समाजगटातील लोकांचा महत्वाचा सहभाग असतो. तरुण आणि प्रौढ सदस्य नृत्य, गीत सादर करतात. पुजारी सदस्य श्लोक पठण करतात आणि धार्मिक कृत्ये करतात. गावातील क्षत्रिय समाजातील भंडारी लोक पवित्र मुखवटे घालून नरसिंह अवतार धारण करतात. या उत्सवाचे यजमान म्हणून जे कुटुंब जबाबदारी घेते त्यांना वर्षभर विविध व्रते आणि नियम पाळावे लागतात.
नाटक, नृत्य, संगीत,वाद्य वादन , मौखिक आणि लिखित कथा यांचे मिश्रण या कलाप्रकारात पहायला मिळते. जमातीचे पर्यावरण, धर्म, संस्कृती याबद्दलचे विविध आयाम या उत्सवात दिसून येतात त्यामुळे याचा जागतिक सांस्कृतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे.