Indian dancer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १९, इ.स. १९३७ बेळ्ळारी (मद्रास प्रांत, ब्रिटिश राज) | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २१, इ.स. २०२३ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
सरोजा वैद्यनाथन (१९ सप्टेंबर १९३७ - २१ सप्टेंबर २०२३) एक भारतीय नृत्यदिग्दर्शक, गुरू आणि भरतनाट्यमच्या उल्लेखनीय समर्थक होत्या.[१] त्यांना भारत सरकारने २००२ मध्ये पद्मश्री आणि २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.[२]
सरोजा वैद्यनाथन (पूर्वाश्रमीच्या धर्मराजन) यांचा जन्म कर्नाटकातील बेळ्ळारी येथे १९ सप्टेंबर १९३७ रोजी झाला. वैद्यनाथन यांचे आई-वडील दोघेही लेखक होते; त्यांची आई कनकम धर्मराजन या तमिळ भाषेतील गुप्तहेर कथांच्या लेखिका होत्या.[३]
त्यांनी चेन्नईतील सरस्वती गण निलयम येथे भरतनाट्यमचे प्रारंभिक प्रशिक्षण घेतले आणि नंतर तंजावूरच्या गुरू कट्टुमन्नर मुथुकुमारन पिल्लई यांच्याकडे शिक्षण घेतले. त्यांनी मद्रास विद्यापीठात प्रोफेसर पी. सांबामूर्ती यांच्या हाताखाली कर्नाटक संगीताचा अभ्यास केला आणि इंदिरा कला संगीत विद्यापीठ, खैरागड येथून नृत्यात डी. लिट मिळवली.[४]
सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण केल्याबद्दल पुराणमतवादी आणि प्रतिकूल प्रतिक्रिया आल्याने वैद्यनाथनने त्यांच्या लग्नानंतर नृत्य करणे सोडून दिले. त्याऐवजी घरीच मुलांना त्यांनी नृत्य शिकवले. १९७२ मध्ये त्यांच्या पतीची दिल्लीला बदली झाल्यानंतर त्यांनी १९७४ मध्ये तेथे गणेश नाट्यालयाची स्थापना केली. त्यांना शुभचिंतक आणि प्रायोजकांनी आर्थिक पाठबळ दिले आणि १९८८ मध्ये कुतब इन्स्टिट्यूशनल एरिया येथे नाट्यालयाची इमारत बांधण्यात आली. नृत्याव्यतिरिक्त, गणेश नाट्यालयातील विद्यार्थ्यांना भरतनाट्यमची सर्वांगीण समज देण्यासाठी तमिळ, हिंदी आणि कर्नाटक गायन संगीत देखील शिकवले जात असे.[५]
वैद्यनाथन एक विपुल नृत्यदिग्दर्शक होत्या आणि त्यांच्याकडे दहा पूर्ण लांबीचे नृत्यनाट्य आणि सुमारे दोन हजार वैयक्तिक भरतनाट्यमचे तुकडे होते.[५] २००२ मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आसियान शिखर परिषदेच्या भेटीसोबत त्यांनी दक्षिण पूर्व आशियाचा सांस्कृतिक दौरा केला.[१] त्यांनी सुब्रमण्य भारतीच्या गाण्यांचे आणि कवितांचे सादरीकरण देखील प्रकाशित केले होते.[१][६]
वैद्यनाथन यांनी भरतनाट्यम आणि कर्नाटक संगीतावर अनेक पुस्तके लिहीली जसे की: द क्लासिकल डान्स ऑफ इंडिया, भरतनाट्यम – एन इन-डेप्थ स्टडी, कर्नाटक संगीतम, आणि द सायंस ऑफ भरतनाट्यम (१९८४) यासह अनेक पुस्तके लिहिली.[१][३]
सरोजयांचे लग्न बिहार कॅडरचे आय.ए.एस अधिकारी वैद्यनाथन यांच्याशी झाले होते.[५] या जोडप्याला कामेश हा मुलगा होता आणि त्यांची सून रमा वैद्यनाथन ही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार आहे. सरोजाची नात, दक्षिणा वैद्यनाथन-बघेल, ही देखील भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे.[७]
वैद्यनाथन यांचे ८६ व्या वाढदिवसानंतर २१ सप्टेंबर २०२३ रोजी कर्करोगाने निधन झाले.[८]
सरोजा यांना २००२ मध्ये पद्मश्री आणि २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[२] त्यांना दिल्ली सरकारचा साहित्य कला परिषद सन्मान, तामिळनाडूचा इयाल इसाई नाटक मनरम आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने बहाल करण्यात आले.[४][९]