अन्नपूर्णा देवी (२३ एप्रिल, १९२७ - १३ ऑक्टोबर, २०१८) या एक प्रमुख भारतीय संगीतकार होत्या. मैहर घराण्याचे संस्थापक अलाउद्दीन खान यांची त्या मुलगी आणि शिष्या होत्या. प्रख्यात सरोद वादक उस्ताद अली अकबर खान हे त्यांचे भाऊ होते.[१]
२३ एप्रिल १९२७ रोजी त्यांचा जन्म झाला. त्याचे मूळ नाव रोशनआरा होते. चार भावंडांपैकी ती सर्वात धाकटी होती. त्यांचे वडील अल्लाउद्दीन खान हे महाराजा ब्रिजनाथ सिंह यांच्या दरबारी संगीतकार होते. जेव्हा अल्लाउद्दीन खान यांनी महाराज ब्रिजनाथ सिंह यांना आपल्याला मुलगी झाल्याचे सांगितले, तेव्हा महाराजाने नवजात मुलीचे नाव अन्नपूर्णा ठेवले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी संगीत शिक्षणाची सुरुवात केली.[२][३][४][१]
इ.स. १९४१ मध्ये अन्नपूर्णा देवींनी हिंदू धर्म स्वीकारला आणि पंडित रविशंकर यांच्याशी लग्न केले. पंडित रविशंकर हे अन्नपूर्णा देवीचे वडील उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचे एक शिष्य होते. लवकरच त्यांना एक मुलगा शुभेंद्र ('शुभो') शंकर झाला. २१ वर्षाच्या संसारनंतर त्यांचा इ.स. १९६२ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर त्या मुंबई येथे स्थाईक झाल्या. घटस्फोटा पूर्वी त्या पंडित रविशंकर यांना व्यासपीठावर संगीताची साथ द्यायच्या, परंतु घटस्फोटानंतर त्यांनी कधीही सार्वजनिक ठिकाणी संगीत सादर केले नाही. मुंबईत येऊन त्यांनी इतरांना संगीत शिक्षण द्यायला सुरुवात केली. इ.स. १९७७ मध्ये त्यांना भरत सरकार कडून पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी स्वतःचे शिष्य ऋषिकुमार पण्ड्या सोबत लग्न केले. इ.स. १९९२ मध्ये त्यांचा मुलगा शुभेन्द्र (शुभो) याचा मृत्यू झाला. नंतर इ.स. २०१३ मध्ये त्यांचे दुसरे पती ऋषिकुमार पण्ड्या यांचा मृत्यू झाला.[५]
अन्नपूर्णा देवीच्या शिष्यात हरिप्रसाद चौरसिया, निखिल बॅनर्जी, अमित भट्टाचार्य, प्रदीप बरोट, सरस्वती शाह (सितार वादक) इत्यादींचा समावेश होतो. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी वयाच्या ९१ व्या वर्षी मुंबईत त्यांचे निधन झाले.[६]