आदेश श्रीवास्तव (४ सप्टेंबर, इ.स. १९६६:जबलपूर, मध्य प्रदेश, भारत - ५ सप्टेंबर, इ.स. २०१५:मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे एक भारतीय गायक व संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी १००हून अधिक चित्रपटांना संगीत दिले होते. आओ प्यार करें हा त्यांचा पहिल प्रदर्शित चित्रपट होता. याआधी त्यांनी कन्यादान या अप्रदर्शित चित्रपटाला संगीत दिले होते.
२००५ साली आदेश श्रीवास्तव दूरचित्रवाणीवरील सा रे गा मा पा - २००५ या गायनस्पर्धेचे परीक्षक होते. पुढच्याच वर्षी त्यांना बालवेश्या व्यवसायावरील सना नावाचा छोटा चित्रपट दिग्दर्शित केला.
अकॉन, ज्युलिया फोरदॅम, डॉमिनिक मिलर, टी-पेन, शकिरा आणि वायसिफ जीन या परदेशी गायकांबरोबर आदेशने काही गाणी गायली. हिटलॅब.कॉम नावाच्या संकेतस्थळावर आदेश श्रीवास्तव यांनी अकॉनला बरोबर घेऊन, भारतस्तरीय कलाकार-शोधाचे कार्यक्रम केले. गाण्याचे तज्ञांकडून विश्लेषण करून, कोणत्या गायकाचे कोणते गाणे गाजेल याचा आगामी अंदाज या कार्यक्रमात केला जात असे.
इ.स. २००० नंतर आदेश श्रीवास्तव यांचे संगीत फारसे प्रसिद्ध झाले नाही.
विजयेता पंडित ही आदेश श्रीवास्तवची पत्नी आहे. नाव संगीत दिग्दर्शक जतीन-ललित हे तिचे भाऊ आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित ही बहीण आहे. आदेशच्या चित्रेश श्रीवास्तव या मोठ्या भावाची आयलाइन टेलिफिल्म नावाची कंपनी राहत फतेह अली खानच्या काळ्या पैशाच्या प्रकरणात बदनाम झाली होते.