?कर्जत रायगड • महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
६५१.२० चौ. किमी • ३३२ मी |
हवामान • वर्षाव |
• ३,३०० मिमी (१३० इंच) |
अंतर • मुंबई पासून • पुणे पासून |
• १०० किमी • १०० किमी |
जिल्हा | रायगड |
लोकसंख्या • घनता • शहर लिंग गुणोत्तर |
• ८४.६५/किमी२ • १८४४२५ ७६.७२ ♂/♀ |
भाषा | मराठी |
आमदार | श्री. महेन्द्र सदाशिव थोरवे |
तहसीलदार | श्री. अविनाश कोष्टी |
नगरपालिका | कर्जत |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४१०२०१ • +०२१४८ • एम एच - ०६ एम एच - ४६ |
निसर्गाने मुक्तहस्ते सृष्टिसौंदर्याची उधळण केलेला पश्चिम किनारपट्टीवरील अतिशय रमणीय असा प्रदूषणमुक्त भूप्रदेश, आंब्याच्या वनात लपलेली टुमदार गावे, ऐतिहासिक परंपरा असलेले किल्ले व दुर्ग, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जागृत देवस्थाने, सह्याद्रीच्या कुशीमधील थंड हवेची ठिकाणे, सांस्कृतिक व पौराणिक वारसा, लोककला, कोकणी जेवण हे सर्व प्रकार कर्जत तालुक्याच्या परिसरात एकत्रितपणे आढळतात. कडाव येथील बाल दिगंबर मंदिर, वेणगांव येथील महालक्ष्मी मंदिर तसेच पळसदरी येथील स्वामी समर्थ यांचा मठ प्रसिद्ध आहे.
महात्मा गांधीजींच्या सन १९४२ च्या ‘छोडो भारत’ चळवळीत सक्रीय सहभागी असलेले आणि भूमिगत राहून कार्य केलेले विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ वीर भाई कोतवाल हे कर्जत तालुक्याचे सुपुत्र होते. तालुक्यात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला पेठ किल्ला अणि बुद्धकालीन कोंढाणे लेणी आहेत. कर्जत तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असून भात, नाचणी, वरी, कडधान्ये, तेलबिया, ही प्रमुख पिके आहेत.
विविध शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, वैद्यकीय सुविधा इत्यादींमुळे कर्जत तालुका प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व पर्यटन स्थळ माथेरान, मिनी ट्रेन, उंचावरून पडणारे दुधाळ धबधबे हे पर्यटकांच्या आकर्षणाची ठिकाणे आहेत.
कर्जत तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक शहर तसेच तालुका आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उल्हास नदीच्या किनारी वसलेले आहे. हे शहर मुंबई-पुणे लोहमार्गावरील मुंबईच्या उपनगरीय मध्य रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून हे रेल्वेस्थानक खंडाळ्याचा घाट या नावाने प्रसिद्ध असलेल्या बोरघाट घाटपायथ्याशी आहे. तसेच मुंबई आणि पुणे यांना जोडणारा कर्जत हा मध्यवर्ती तालुका आहे.
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
कोकणात पावसाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पावसाळ्यात नदीच्या उगमाकडील तीव्र उताराकडून पाणी दुधडी भरून वाहते. काही नद्यांच्या मुखाकडील भाग खडकाळ असल्यामुळे या भागामध्ये नदीचा प्रवाह गढूळ व तुटक होतो. समुद्र अगदी जवळ असल्यामुळे नदीच्या प्रवाहाच्या मुखाकडील भागावर भरती-ओहोटीचा परिणाम होत असतो. तालुक्याच्या उत्तरेकडून उल्हास नदी वाहते तसेच कर्जत तालुक्यातील पेजच्या खो-यात सह्याद्री पर्वताचे उंच कडे आहेत. त्यामुळे भिवपूरी या जलविद्युत निर्मिती केंद्राला उत्तम जागा लाभली आहे.
ऐतिहासिक किल्ले म्हणले, की सर्वप्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणे या किल्यांमुळेच शक्य झाले होते. दख्खनच्या पठारावर दक्षिणोत्तर पसरलेला सह्याद्री व त्याच्या उपशाखा म्हणजे किल्यांसाठीची उपयुक्त ठिकाणे असल्याने सह्याद्री पर्वतामध्ये सर्वाधिक किल्ले बांधले गेले. डोंगरी किल्यांबरोबरच समुद्रमार्गे येणा-या शत्रूशी चार हात करण्यासाठी भर समुद्रात तसेच समुद्रकिनारीही काही दुर्ग बांधले गेले. रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात जवलपास पन्नासपेक्षा जास्त डोंगरी किल्ले आहेत. यापैकी बहूतेक किल्ले भक्कम व बुलंद अवस्थेत आहेत. रायगड जिल्ह्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या किल्यांळे येथील पर्यटनाला चालना मिळाली आहे. अनेक पर्यटक येथे दुर्गभ्रमंतीसाठी भेट देत असतात.
प्राचीन भारतात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये बौद्ध, शैव, वैश्णव, जैन या संप्रदायांच्या अनुयायांनी तसेच नाथपंथीय संप्रदायांच्या अनुयायांनी अनेक गुफा, लेणी, विहार व चैत्यगृहे निर्माण केली. महाराष्ट्रातील डोंगरांमध्ये असणारा अग्निजन्य खडक खोदकामाकरिता उपयुक्त असल्याने भारताच्या सर्वाधिक लेणी महाराष्ट्रात आहेत. विविध कालखंडांमधील धर्मसंस्था व राज्यसंस्था यांच्या उत्कर्षाच्या काळात धार्मिक व सामाजिक गरजेपोटी अनेक लेणी खोदण्यात आली. प्राचीन काळी कोकणातून देशाकडे व्यापारउदीम होत असे. त्याकाळी जिल्ह्यात जी काही प्रमुख बंदरे अथवा व्यापारी मार्ग होते, अशा मार्गाजवळ विश्रांतिस्थाने म्हणून ह्या लेण्यांची निर्मिती झाली. जिल्ह्यातील बहुतांश लेणी बौद्धकालीन असली तरी काही लेणी कलचुरीकालीन आहेत. काही लेणी हीनयान व उत्तर हीनयान काळातील आहेत, तर काही हीनयान व महायान यांच्यामधील संक्रमण काळातील आहेत. एखाददुसरी लेणी महायान काळातील आहेत. जिल्ह्यातील ब-याचशा लेण्यांची कालैघात पडझड झाली असली, तरी सध्या अस्तित्वात असलेल्या शिल्पांवरून तत्कालीन वैभवाची कल्पना येते.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) कर्जत ते दादर, पनवेल, पेण, पाली, खोपोली ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.
कर्जत हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. कर्जत - पनवेल ही लोकलसेवा नवीन सुरू झाली आहे.
महाविद्यालय (कॉलेज) / संस्था (इन्स्टिट्यूट) |
---|
अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय |
कर्जत शिक्षण संस्था इंग्रजी माध्यम |
स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय पांडुरंग डोंबे विद्या निकेतन |
कोकण ज्ञानपीठ कर्जत कॉलेज ऑफ़ कला, विज्ञान व वाणिज्य |
कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ़ फार्मसी व संशोधन संस्था |
इब्सर कॉलेज ऑफ़ विज्ञान व वाणिज्य |