किरिक पार्टी हा २०१६चा कन्नड भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, जो ऋषभ शेट्टी यांनी दिग्दर्शित केला तर जी. एस. गुप्ता आणि रक्षित शेट्टी यांनी निर्मिती केली. यात रक्षित शेट्टी, रश्मिका मंदान्ना, संयुक्ता हेगडे आणि अच्युथ कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अरविंद अय्यर, धनंजय रंजन, चंदन आचार आणि प्रमोद शेट्टी यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. रक्षित शेट्टीने कथा लिहिली आणि द सेव्हन ऑड्स (ज्यात रक्षित शेट्टी, ऋषभ शेट्टी, अभिजित महेश, धनंजय रंजन, किरणराज के, चंद्रजीथ बेलिअप्पा यांचा समावेश आहे) या टीमसह पटकथा देखील लिहिली.
३० डिसेंबर २०१६ रोजी चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला, ज्याला समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट बनला आणि २५०-दिवस १५ पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये तो चालला[१] आणि मल्टिप्लेक्समध्ये ३६५-दिवस पूर्ण केले.
चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कौटुंबिक मनोरंजनासाठी कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला, आणि ६४ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स दक्षिणमध्ये सात श्रेणींमध्ये नामांकन मिळाले, त्यापैकी पाच जिंकले. याला आयफा उत्सवममध्ये पाच पुरस्कार आणि सहाव्या दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सात पुरस्कार मिळाले. या चित्रपटाचा तेलगूमध्ये किरक पार्टी या नावाने रिमेक करण्यात आला.[२]