गौरी देशपांडे | |
---|---|
![]() | |
जन्म | फेब्रुवारी ११, १९४२ |
मृत्यू | मार्च १, २००३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
विषय | व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीवादी साहित्य |
वडील | दिनकर उर्फ डी. डी. कर्वे |
आई | इरावती कर्वे |
गौरी देशपांडे (जन्म : ११ फेब्रुवारी १९४२; - १ मार्च २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार देशपांडे यांनी हाताळले.[१] मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. देशपांडेंच्या आई लेखिका, संशोधक इरावती कर्वे होत्या. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील होते. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे देशपांडेंचे यांचे काका होते.
गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. संपादकीय मनोगतात वि. म. गीताली म्हणतात, 'गौरीनं माणसाच्या देहाकडे स्त्रीदेह आणि पुरुषदेह या द्वैतभावनेनं न बघता निखळ मानवी देह म्हणून बघितलं जावं असं म्हणत स्त्रीच्याच देहाभोवती बांधलेले नैतिकतेचे निकष तोडायला सुरुवात केली.'[२] १९६८ साली प्रकाशित झालेला 'Beetween Births' हा काव्यसंग्रह देशपांडेंचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होतं. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या लिखाण करत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सूचीत आढळतात.[१]