जॉर्ज बिल्स शेल्लर हे ( २६ मे १९३३[१]) हे जर्मन वंशाचे, अमेरिकन सस्तन प्राणीतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्ग संरक्षक आणि लेखक आहेत.[२][३][४]आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेत वन्यजीवांचा अभ्यास करणारे जगातील प्रमुख जीवशास्त्रज्ञ म्हणून शेल्लर ओळखले जातात. त्यांचा जन्म बर्लिनमध्ये झाला, शेल्लर यांचे लहानपण जर्मनीमध्ये गेले पण किशोरवयात ते मिसुरीला स्थलांतरीत झाले. शेल्लर पॅन्थेरा कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्जार कुलातील प्राण्यांविषयीच्या समितीचे अध्यक्ष आहेत. ते ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे ज्येष्ठ संरक्षक आहेत.
शेल्लर यांनी १९५५ मध्ये अलास्का विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली[१] आणि १९६२ मध्ये ते पीएचडी मिळविण्यासाठी विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात गेले.[१] १९६२ ते १९६३ या काळात ते स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या वर्तणूक विज्ञान विभागात फेलो होते.[१] १९६३ ते १९६६ पर्यंत, शेल्लर यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या पॅथोबायोलॉजी विभागात संशोधन सहकारी म्हणून काम केले.आणि १९६६ ते १९७२ या काळात रॉकफेलर विद्यापीठात आणि न्यू यॉर्क झूलॉजिकल सोसायटीमध्ये संशोधन व प्राण्यांचे वर्तन या क्षेत्रात सहाय्यक संशोधक म्हणून काम केले. १९७२ ते १९७९ या काळात त्यांनी सेंटर फॉर फिल्ड बायोलॉजी अँड कन्झर्व्हेशनमध्ये समन्वयक म्हणून काम केले आणि त्यानंतर त्यांनी १९७९ ते १९८८ या काळात न्यू यॉर्क झूलॉजिकल सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय संवर्धन कार्यक्रमाचे संचालक म्हणून काम पाहिले.
वयाच्या सव्वीसाव्या वर्षी शेल्लर पर्वतीय गोरीलांच्या अभ्यासासाठी मध्य आफ्रिकेत, सध्याच्या युगांडा, रवांडा आणि कांगो रिपब्लिक यांच्या सीमा एकत्र आलेल्या प्रदेशात गेले. तोवर नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या गोरीलांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती. आपल्या अभ्यासावर आधारित १९६३ मध्ये शेल्लर यांनी 'द माउंटन गोरिला: इकॉलॉजी अँड बिहेवियर' हे पुस्तक प्रसिद्ध केले.[१] गोरिला हे हिंस्त्र असतात हा तेव्हा असलेला गैरसमज मोडून काढून ते बुद्धिमान, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असतात, असे त्यांनी याद्वारे दाखवून दिले.
शेल्लर यांनी २० डिसेंबर १९६३ ते १७ जानेवारी १९६५ आणि ११ ते ३१ मार्च १९६५ या सुमारे चौदा महिन्यांच्या काळात कान्हा अभयारण्यामध्ये वन्यजीवांचे निरीक्षण आणि अभ्यास केला. या नोंदी 'द डियर अँड द टायगर: अ स्टडी ऑफ वाईल्डलाईफ इन इंडिया' या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.[५]
शेल्लर यांनी आफ्रिकेतील आणि आशियातील सस्तन प्राण्यांबद्दल पंधराहून जास्त पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये सेरेन्गेटी लायन:अ स्टडी ऑफ प्रीडेटर-प्रे रिलेशनशिप, द लास्ट पांडा, तिबेटस हिडन वाईल्डरनेस, तिबेट द वाईल्ड या त्यांनी स्वतः केलेल्या अभ्यासावर आणि या प्रजातींचा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात केलेल्या निरीक्षणावर आधारित पुस्तकांचा समावेश आहे.याशिवाय शेल्लर यांनी वाघ, जग्वार, चित्ता आणि बिबटे तसेच जंगली मेंढ्या, शेळ्या या प्राण्यांबद्दल नियतकालिकांमध्ये अनेक लेख, डझनावारी पुस्तके आणि शास्त्रीय लेख लिहिले आहेत. पाच दशकांपेक्षा जास्त काळ वन्यजीव संरक्षणाचे काम केलेल्या शेल्लर यांनी जगभरातील वन्यजीव संरक्षणाच्या प्रयत्नांना आकार दिला आहे.
शेल्लर यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या कामगिरीबद्दल त्यांना नॅशनल जिओग्राफिकच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.[६] तसेच त्यांना गगनहेम फेलोशिप[७], संकटग्रस्त प्रजातींबद्दलचे आकलन आणि संवर्धन यातील योगदानाबद्दल १९८० साली वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडचे सुवर्ण पदक देण्यात आले.[८]