थोलापावाकुत्थु हा दक्षिण भारतातील बाहुलीनाट्याचा प्रकार आहे.थोला म्हणजे चामडे, पावा म्हणजे बाहुली आणि कुत्थु म्हणजे खेळ अशी या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते.[१] दक्षिण भारतातील केरळ ,आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, ओरिसा, तमिळनाडू तसेच महाराष्ट्र येथे या बाहुली नाटकाचे खेळ सादर केले जातात.[२]
या बाहुलीनाटकातील चित्रे ही चामड्यापासून तयार केलेली असतात. वाद्य वादन, संगीत, काव्य आणि नाटक अशा विविध कलांचा वापर या कलाप्रकारात केला जातो.
बकरे आणि म्हैस यांच्या कातड्याचा वापर करून त्यापासून बाहुली तयार केली जाते. जुन्या बाहुलीचा आकार नव्या चामड्यावर आरेखून घेतला जातो. अणुकुचीदार सुईने हे अंकन केल्यानंतर कात्रीने तो आकार कापून घेतला जातो. खिळे ठोकून अलंकरण करण्यासाठी छिद्रे तयार केली जातात. बाहुली दोन्ही बाजूंनी रंगवून झाली की प्राण्यांच्या शेपट्याचे केस वापरून बाहुली सजविली जाते. बाहुली रंगवायला हळद, पाने, काजळ असे नैसर्गिक रंग वापरले जातात. बांबूच्या काठीला छेद देऊन दोऱ्याने बाहुलीचे अवयव बांधले जातात.
केरळमध्ये समान्यपणे देवळाच्या अंगणात परिसरात हा खेळ सादर केला जातो. या खेळासाठी ४२ फूट लांबीचे व्यासपीठ तयार केले जाते. त्यावर एक आडवा पडदा लावला जातो. पडद्यामागे थोडे अंतर सोडून पाच फुटावर एक तुळई घट्ट रोवली जाते. त्यावर माती किंवा करवंटीचे २१ दिवे लावले जाते. कापडाची वात आणि खोबरेल तेल याने हे दिवे पेटविले जातात. दिव्यांच्या प्रकाशामुळे बाहुल्यांच्या रंगीत सावल्या पडद्यावर पडतात आणि त्यातून हा खेळ घडत जातो.[१] या खेळाचे सादरीकरण करण्यामागे काही श्रद्धा अनुभवायला मिळतात जसे दुष्काळ पडल्यास पाऊस पडण्यासाठी, शेतात चांगले पीक येण्यासाठी, जनावरांचे आजार बरे होण्यासाठी हा खेळ सादर केला जातो.[३]