दादासाहेब गायकवाड

भाऊराव गायकवाड

गायकवाड यांचे डाक तिकीट
टोपणनाव: दादासाहेब गायकवाड
जन्म: १५ ऑक्टोबर १९०२
मृत्यू: २९ डिसेंबर १९७१

भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड (जन्म : १५ ऑक्टोबर १९०२, - २९ डिसेंबर १९७१) हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चळवळीत प्रगल्भ, विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होय. गायकवाड आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते[ संदर्भ हवा ], तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.

सामाजिक कार्य

[संपादन]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतं, "माझ्या आत्मचरित्रात अर्धा भाग भाऊराव गायकवाड असणार आहे. तो नसला, तर माझे चरित्र पूर्ण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्यातच दादासाहेब गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीत व बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षातील महत्त्वाचे स्थान दिसून येते. बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता. मार्च २, इ.स. १९३०च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी डॉ. आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे.

अनेक आंदोलनांत आंबेडकरांना साथ त्यांनी दिली होती. समाजाविषयींचा त्यांचा कळवळा हा आंतरिक उमाळ्यातून आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील दलित जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जो व्यापक संघर्ष सुरू केला त्या संघर्षात बाबासाहेबांना साथ देण्यासाठी सुरुवातीच्या काळात पुढे आलेल्या दलित युवकांपैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे एक होत. २० मार्च, १९२७ चा महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि २ मार्च, १९३० चा प्रत्यक्षात ३ मार्च, १९३० रोजी केला गेलेला नाशिक येथील काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह, या सत्याग्रहांमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बरोबरीने भाग घेतला होता. डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या इतर चळवळीं मध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात दादासाहेबांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्रसमितीचे एक प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जात होते

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे शेतकऱ्यांसाठी कार्य

धर्मांतर

[संपादन]

१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

राजकीय कारकीर्द

[संपादन]

इ.स. १९३७ ते १९४६ या काळात गायकवाड मुंबई विधानसभेचे, तर इ.स. १९५७ ते १९६२ या काळात लोकसभेचे सदस्य होते. १९५७–५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते होते. इ.स. १९६२ ते ६८ दरम्यान ते राज्यसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते.

रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व

[संपादन]

भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर त्या पक्षाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. पुढे या पक्षाची फाटाफूट झाल्यावर त्याच्या एका प्रभावी गटाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. रिपब्लिकन पक्षात ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले; पण दुर्दैवाने त्यामध्ये त्यांना यश आले नाही. तथापि, दलित समाजातील सर्वांत मोठ्या गटाने गायकवाडांच्या नेतृत्वालाच मान्यता दिली होती.

१९३७ मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. भारतीय संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे ते अनुक्रमे १९५७ ते १९६२ आणि १९६२ ते १९६८ सदस्य होते. लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना दुसरे सदस्य प्रकाशवीर शास्त्री यांनी धर्मांतराविरुद्ध विधेयक आणण्याच्या केलेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ त्यांनी लोकसभेत मनुस्मृती फाडून १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून केलेल्या प्रतीकात्मक निषेधाची आठवण करून दिली. भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या सार्वजनिक कार्याचा व समाजसेवेचा गौरव केला होता. मृत्यू – २९ डिसेंबर, १९७१.

सन २००१-०२ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करून त्यांच्या कार्याची स्मृती जागवली.

चरित्रे/गौरवग्रंथ

[संपादन]

दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतले काही हे ---

  • ’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा मराठी व इंग्रजी ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.
  • ’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’—लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले
  • दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.
  • अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
  • भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्त्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अ‍ॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.
  • दि.रं. भालेराव यांनीही ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ या नावाचे एक छोटे चरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.

पुरस्कार व सन्मान

[संपादन]
  • कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे २००२ पासून दिला जाणारा पुरस्कार आहे.
  • दादासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना' या नावाची एक योजना २००४पासून आहे. २०१२साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला होता. मात्र त्यापूर्वी केवळ २५० लोकांना जमिनी मिळाल्या होत्या.
  • भारत सरकारने गायकवाडांना १९६८मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला.
  • नाशिकमध्ये एका सभागृहाला ’दादासाहेब गायकवाड सभागृह’ नाव दिले आहे.
  • मुंबईत अंधेरीभागात 'दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र' नावाची संस्था आहे.
  • दादासाहब गायकवाड यांचा परिचय करून देणारी एक १३ मिनिटांची ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]