दिलीप कुमार रॉय - हे बंगाली गायक, संगीतकार, संगीतशास्त्रज्ञ, कादंबरीकार, कवी आणि निबंधकार होते. त्यांनी बंगाली भाषेत ७५ आणि इंग्लिश भाषेत २६ पुस्तके लिहिली आहेत.[१]
दिलीप कुमार हे विख्यात बंगाली कवी द्विजेन्द्रलाल राय यांचे पुत्र होते.
दिलीप कुमार रॉय | |
---|---|
जन्म | २२ जानेवारी १८९७ |
मृत्यू | ०६ जानेवारी १९८० |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | बंगाली |
दिलीप कुमार कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये रुजू झाले. येथे सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्यांचा परिचय झाला. गणितामध्ये प्रथम श्रेणी संपादन करून, १९१९ मध्ये ते ट्रायपोजसाठी केंब्रिजला गेले. ट्रायपोजच्या पहिल्या भागाव्यतिरिक्त, ते पाश्चात्य संगीताच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले.
संगीताचे शिक्षण घेण्यासाठी जर्मनी आणि इटलीला जाण्यापूर्वी, पियानोचे शिक्षण त्यांनी घेतले. त्याचबरोबर त्यांनी फ्रेंच, जर्मन आणि इटालियन भाषा आत्मसात केल्या. रॉय हे रोमेन रोलँड, बर्ट्रांड रसेल, हर्मन हेस, जॉर्जेस डुहामेल यासारख्या व्यक्तिमत्त्वांना भेटले. युरोपातील विविध देशांना भेटी देऊन त्यांनी युरोपीय संगीताचा अभ्यास केला.[२]
१९२४ साली त्यांनी पाँडिचेरी येथे श्रीअरविंद यांना भेट दिली आणि त्यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांना राहण्याची परवानगी मिळाली नाही. युरोपच्या दुसऱ्या दौऱ्यानंतर, ऑगस्ट १९२८ मध्ये ते पाँडिचेरीला परतले आणि १९५२ पर्यंत येथेच राहिले.[१]
१९५३ साली भारताचे सांस्कृतिक राजदूत या नात्याने त्यांनी जगप्रवास केला.[३]
१९५३ मध्ये श्रीअरविंद आश्रम सोडल्यानंतर काही वर्षांनी आणि जागतिक दौऱ्यातून परतल्यावर, आपल्या शिष्य इंदिरा देवीसोबत त्यांनी १९५९ मध्ये पुणे येथे हरीकृष्ण मंदिराची स्थापना केली. येथेच त्यांचे निधन झाले.[१]
१९६५ मध्ये, संगीत नाटक अकादमी, भारताच्या राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाटक अकादमीने त्यांना त्यांच्या जीवनगौरवासाठी सर्वोच्च सन्मान, संगीत नाटक अकॅडमी फेलोशिप प्रदान केला. [४]
रॉय यांना संस्कृत कॉलेज (कलकत्ता) यांच्यातर्फे सूर-सुधाकर ही पदवी देण्यात आली. तसेच कलकत्ता विद्यापीठ आणि रवींद्र भारती यांच्यातर्फे त्यांना डी.लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली.[३]