नाताळ गीते (कॅरॉल्स) ही नाताळ या सणाशी संबंधित गीतांची संकल्पना आहे. नाताळ सणाच्या आधी वा त्या आसपासच्या काळात ही गीते अथवा स्तोत्रे म्हणण्याची पद्धती ख्रिस्ती धर्मात प्रचलित आहे.[१] फ्रान्समध्ये रचल्या गेलेल्या या गीतांना नोएल असेही संबोधिले जाते.[२] नाताळ संगीत या विशिष्ट संकल्पनेचा एक भाग म्हणूनच ही गीते मान्यता पावली आहेत.[३]
पगान संस्कृतीतील हिवाळी संक्रमण उत्सवाशी या गीतांचा संबंध मनाला जातो.[४] वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून २२ डिसेंबर हा दिवस ओळखला जातो. त्या दिवशी आनंदाने आणि नाचून गायलेली गाणी असाच केरोल्स या शब्दाचा अर्थ आहे.[५]
रोममध्ये सर्वप्रथम इसवी सनाच्या चौथ्या- पाचव्या शतकात नाताळ गीते गायली गेली असे मानले जाते. स्पेनमधील कवी पृदेन्शियस याने रचलेली नाताळ गीते आजही काही प्रार्थनागृहात गायली जातात. इसवी सनाच्या नवव्या-दहाव्या शतकात उत्तर युरोपीय प्रार्थनागृहात यमक रचनेत लिहिली गेलेली गीते गायला सुरुवात झाली. बाराव्या शतकात पर्शिया येथील संत व्हिक्टर यांनी काही प्रचलित गीतांच्या प्रसिद्ध चाली वापरून नाताळ गीते गाण्याची नवी पद्धती सुरू केली.तेराव्या शतकात फ्रान्स, जर्मनी विशेषतः इटली येथे स्थानिक भाषेचा वापर करून रचलेली गीते गाण्याची महत्त्वाची पद्धती सुरू झाली. सध्या जी गीते गायली जातात ती शेतीच्या हंगामाच्या काळात गायली जाणारी प्राचीन लोकगीते आहेत. कालांतराने ही गाणी चर्चमध्ये गायली जाऊ लागली आणि नाताळ या सणाशी त्यांचा निकटचा संबंध प्रस्थापित झाला.[६]
नाताळ सणाच्या चार दिवस आधी म्हणजे मुले नाताळ गीते गात समूहाने आपल्या गावातून, वस्तीतून फिरतात. प्रत्येक घरापाशी थांबून अशी गीते गाण्याची पद्धती असल्याचे दिसते. त्यानंतर या मुलांना खाऊ, पैसे दिले जातात. येशू जन्मानिमित्त लोक आपापल्या घरी जुन्या लोकगीतांच्या चालीवर आधारित नाताळ गीते गातात. चर्चमध्ये येशूजन्माच्या रात्री विशिष्ट पद्धतीच्या संगीतात बांधलेल्या रचना भक्तिभावाने गाण्याची प्राचीन परंपरा दिसून येते. यामध्ये प्रेषितांचे आगमन, त्यांची महानता, दान करण्याचे महत्त्व, सणाचा आनंद घेणे अशा आशयाची ही गीते असतात. आधुनिक संगीत प्रकारची तंत्रे वापरून नाताळ गीते विविध आधुनिक वाद्यांच्या साथीने, नव्या चालीत गाण्याची पद्धती संगीतकार वर्गाने नव्याने समाजात प्रचलित केल्याचे दिसून येते.[२]