निर्भय नादिया

हंटरवाली चित्रपटाचे पोस्टर
हंटरवाली चित्रपटाचे पोस्टर

मेरी ॲन एव्हान्स, मेरी एव्हान्स वाडिया तथा फियरलेस नादिया (८ जानेवारी , १९०८:पर्थ, ऑस्ट्रेलिया – ९ जानेवारी, १९९६:मुंबई, महाराष्ट्र, भारत) भारतीय फिल्म जगतातील एक अभिनेत्री आणि स्टंट नायिका होती. हिने १९३०-४० दरम्यान चित्रपटांत कामे केली. ही स्वतःची धाडसी दृश्ये स्वतःच करत असे

हिने हंटरवाली या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती. २०१७मध्ये प्रदर्शित झालेला रंगून हा हिंदी चित्रपट हिच्या जीवनावर काहीसा आधारित आहे.

बालपण

[संपादन]

१९०८ मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे एक ब्रिटिश सैनिक आणि ग्रीक आईच्या पोटी जन्माला आलेली नादिया (मूळ नाव : मेरी ॲन एव्हान्स) १९१३ मध्ये वडिलांच्या बरोबर भारतात आली. पेशावरमध्ये रहात असताना तिच्या वडिलांचा युद्धात मृत्यू झाला. त्यानंतर मेरी वयाच्या विशीतच घोडेस्वारी, जिम्नॅस्टिक्स, टेनिस, बालेनृत्य, टॅपनृत्य अशी अनेक कौशल्ये शिकली. एका सर्कसमध्ये नोकरी पत्करून मेरीने भारतभर भ्रमंती सुरू केली. नावात बदल करून तिने स्वतःसाठी नादिया असे नाव घेतले.

चित्रपट सृष्टी

[संपादन]

वाडिया मूव्हीटोन या चित्रपट निर्मिती कंपनीचे मालक जमशेद बोमन होमी वाडिया आणि त्यांचे भाऊ होमी वाडिया हे दोघेजण नादियाच्या कौशल्याने प्रभावित झाले. १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या देश दीपक या चित्रपटातील नादियाची छोटी भूमिका खूपच गाजली. १९३५ मध्ये 'हंटरवाली' या होमी बंधूंच्या चित्रपटात नादीयाला प्रमुख भूमिका मिळाली. आपल्या वडिलांच्या राज्यात अन्यायाविरुद्ध लढा देणारी रोबिनहूड सारखी नायिका प्रचंड लोकप्रिय झाली. १९६८ मध्ये आलेला जेम्स बॉंड सदृश्य 'खिलाडी' हा तिचा शेवटचा चित्रपट.

एक युरोपियन गोरी स्त्री भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देते आहे ही बाब तत्कालीन भारतीय प्रेक्षकांना बहुतेक फारच रुचली असावी. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील नादियाचे चित्रपट आणि त्यातील हाणामाऱ्या अतिशय लोकप्रिय झाल्या.

नूर-ए-यमन, डायमंड क्वीन, जंगल प्रिन्सेस, बगदाद का जादू, लेडी रोबिनहूड, हंटरवाली की बेटी अशा सुमारे ५५ चित्रपटात नादियाने काम केले. या पैकी ३३ चित्रपटांत तिचा नायक जॉन कावस हा होता.

उत्तरायुष्य

[संपादन]

१९६१ मध्ये नादियाने होमी वाडिया यांच्याशी विवाह केला. चित्रपटसृष्टीतून निवृत्ती पत्करल्यावर नादियाने शर्यतीच्या घोड्यांची पैदास या व्यवसायाकडे लक्ष दिले. 'निजीन्स्की' या नावाचा तिचा घोडा भारतीय रेस शौकीनांमध्ये भयंकर गाजला होता.

८ जानेवारी १९९६ मध्ये मुंबईतील खंबाला हिल रुग्णालयात नादियाचे निधन झाले.

सन्मान

[संपादन]

नादियाचा पणतू रियाद विन्ची वाडिया याने 'फियरलेस : द हंटरवाली स्टोरी' हा माहितीपट १९९३मध्ये बनवला. विशाल भारद्वाज यांच्या रंगून (२०१७) या चित्रपटातील कंगना राणावत हिचे पात्र नादियाच्या भूमिकेवरून सुचलेले आहे. गुगल ने ८ जानेवारी १९१८ रोजी नादियाच्या ११०व्य जयंतीनिमित्त डुडल बनवून तिला श्रद्धांजली वाहिली.[]

  1. ^ http://www.thehindu.com/entertainment/movies/google-doodle-celebrates-bollywoods-fearless-nadia/article22394881.ece