पुथंडु ( तमिळमधे தமிழ்புத்தாண்டு) हे तमिळ कालदर्शिकेनुसार सुरू होणारा तामिळनाडू मधील नवीन वर्षारंभाचा सण आहे. हिंदू सौर कालगणनेनुसार चैतिराई या तमिळ महिन्यानुसार हा सण साजरा केला जातो. याला 'पुथुवरुषम' असे संबोधिले जाते.[१]ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः १४ एप्रिल या दिवशी साजरा केला जातो.
इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील संगम साहित्यात सूर्याच्या मेष राशीतून प्रवेशाचे संदर्भ मिळतात.सिल्लप्पदिकरम् नावाच्या ग्रंथातही या काळातील सूर्याचे भ्रमण आणि त्यानिमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सणाचा उल्लेख आलेला आहे.[२]मणिमेखलई या प्रसिद्ध ग्रंथातही या सणाचे उल्लेख सापडतात.[३]
पुत्तांडु वाळत्तुक्कळ (புத்தாண்டு வாழ்த்துக்கள்) किंवा इनिय पुत्तांडु नल्वाळत्तुक्कळ (இனிய புத்தாண்டு நல்வாழ்த்துக்கள்)असे म्हणत एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.[४]
या दिवसासाठी घराची स्वच्छता केली जाते. आंघोळ करून नवे कपडे परिधान केले जातात. घरातील देवघरासमोर फुले,फळे यांची आरास करून देवपूजा करतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.जवळपासच्या देवळात जाऊन दर्शन घेतात. दुपारी शाकाहारी भोजनाचा एकत्रित आनंद घेतला जातो.[५]
दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात या सणाला चैत्तिरीई विशू असे म्हणतात.केरळातील विशु सणाप्रमाणेच या दिवशी संध्याकाळी देवासमोर आंबा,केळे,फणस ही फळे मांडली जातात.सुपारी, विड्याची पाने, सोन्याचा दागिना, पैसे, फुले आणि आरसे मांडून ठेवतात.[६]
नववर्षाच्या पहिल्या दिवशी मदुराई येथील मीनाक्षी मंदिर येथे मोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जाते.[७]
पुथंडूचा सण श्रीलंकेतही उत्साहाने साजरा होतो.[८] या दिवशी नव्या वर्षातील पहिला आर्थिक व्यवहार केला जातो याला 'काई विशेषम्' म्हणले जाते. या दिवशी लहान मुले ज्येष्ठ मंडळींना वंदन करतात. पैशाचे पाकीट देऊन मुलांना आशीर्वाद दिले जातात. पुढील हंगामाचे नवे पीक घेण्याची सुरुवात म्हणून जमीन खणण्याचा आणि नांगरण्याचा छोटा विधी या दिवशी केला जातो.याला 'अरपुडु' म्हणतात.या दिवशी गावांमधील युवा मंडळ पारंपरिक खेळांच्या स्पर्धा भरवतात. गाड्याच्या शर्यती, नारळ फेकून खेळला जाणारा खेळ अशा स्पर्धा आयोजित होतात.[९]