कंवरजीत पेंटल अहलुवालिया, किंवा निव्वळ पेंटल (२२ ऑगस्ट१९४८ - हयात) हे एक भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार आहेत. त्यांनी प्रथम विनोदी अभिनेता म्हणून अभिनायाच्या कारकिर्दीस सुरुवात केली आणि नंतर कालांतराने इतरांना अभिनय शिकवण्यास सुरुवात केली. पेंटल यांनी केवळ चित्रपटांमध्येच नाही तर दूरदर्शनवरही काम केले आहे.
पेंटल यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर जवळ असलेल्या तरन तारन नावाच्या गावातील एका शीख कुटुंबात झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे आयुष्य आपल्या कुटुंबीयांसह सदर बाजार, दिल्ली येथे व्यतीत केले. १९६९ मध्ये पेंटल मुंबईत आले आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत अभिनयाचे शिक्षण घेतले. कालांतराने २००८ मध्ये ते याच संस्थेच्या अभिनय विभागाचे प्रमुख झाले. त्यांचा भाऊ गुफी पेंटल यांनी बीआर चोप्रा यांची दूरदर्शन वरील प्रसिद्ध मालिका 'महाभारत' मध्ये शकुनी मामाची भूमिका साकारली होती. तर स्वतः पेंटल यांनी शिखंडी आणि सुदामाच्या भूमिका केल्या होत्या. त्यांचा मुलगा हितेन पेंटल हा देखील एक अभिनेता आहे, ज्याने दिल मांगे मोर (२००४) आणि बचना ऐ हसीनो (२००८) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.[१]
पेंटलच्या काही उल्लेखनीय भूमिकांमध्ये जवानी दिवानी (१९७२) मधील रतन, रफू चक्कर (१९७५) मधील सलमा, बावर्ची (१९७२) मधील गुरुजी, पिया का घर (१९७२) मधील अरुण, परिचय (१९७२) मधील पंडितजी (ज्योतिषी), तोताराम यांचा समावेश होता. जंगल में मंगल (१९७२), हीरा पन्ना (१९७३) मधील कमल, रोटी (१९७४) मधील मुख्याध्यापक, खोटे सिक्के (१९७३) मधील रामू आणि सत्ते पे सत्ता (१९८२) मधील बुध आनंद. आज की ताजा खबर (१९७३) मधील चंपक बूमिया ही त्यांची सर्वात उल्लेखनीय भूमिका होती. त्यांनी साकारलेल्या 'चंपक भूमिया' या व्यक्तिरेखेसाठी हा चित्रपट खूप यशस्वी ठरला. कॉमिक भूमिका साकारण्यापासून, पेंटलने गंभीर पात्र भूमिका साकारल्या आहेत, त्यापैकी सर्वात अलीकडील दूरचित्रवाणी नाटक प्यार का दर्द है कुछ मीठा मीठा आहे.