फैजपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील एक छोटे शहर आहे.
फैजपूर | |
---|---|
नगर | |
Nickname(s): | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | जळगाव |
तालुका | यावल |
उंची | २२६ मीटर (७४१ फूट) |
सरकार | |
• प्रकार | नगरपालिका |
• नगराध्यक्षा | महानंदा टेकाम-होले |
भाषा | |
• कार्यालयीन | मराठी |
लोकसंख्या (२०११) | |
• शहरी | २६,६०२ |
वेळ क्षेत्र | UTC+५:३० (भाप्रवे) |
पिन कोड |
४२५५०३ |
दूरध्वनी | ०२५८५ |
वाहन नोंदणी | MH-19 |
लोकसभा मतदारसंघ | रावेर |
विधानसभा मतदारसंघ | रावेर |
फैजपूर हे शहर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यात आहे. फैजपूरचे भौगोलिक स्थान २१.१७° उ. ७५.८८° पू. असून शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची सरासरी २२६ मीटर एवढी आहे. शहराचा भूभाग हा जवळजवळ समतल आहे.
शहराच्या पश्चिमेकडे सुमारे ३ कि.मी. अंतरावर मोर नदी वाहते तर शहरातून धाडी नदी वाहते, जी मोर नदीची उपनदी आहे.
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार फैजपूरची लोकसंख्या ही २६,६०२ एवढी आहे. ज्यात ५२% पुरुष तर ४८% महिला आहेत. यातील १३% लोकसंख्या ही ६ वर्षाखालील आहे.
फैजपूरची सरासरी साक्षरता ८५.९६% असून एकूण ८९.४५% पुरुष आणि ८२.२८% महिला साक्षर आहेत.
इतिहासात दिल्ली सल्तनत, मुगल व मराठा साम्राज्याच्या राजवटीत फैजपूर हे गाव खानदेश प्रांतात होते. ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी खानदेशचा मुंबई प्रांतात समावेश करून त्याला जिल्हा बनवण्यात आले. तत्कालिन खानदेश जिल्ह्यात फैजपूर हे गाव सावदा तालुक्यात होते. खानदेश जिल्ह्याच्या विभाजनानंतर फैजपूरचा पूर्व खानदेश जिल्ह्याच्या यावल तालुक्यात समावेश करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये मुंबई प्रांतचे मुंबई राज्य बनले व १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या दरम्यान पूर्व खानदेश जिल्ह्याचे नामांतर जळगाव जिल्हा असे करण्यात आले.
पूर्वीच्या काळात यावलहून बऱ्हाणपूरला जाणाऱ्या फौजांचा मुक्काम येथे असायचा. त्यामुळे हे ठिकाण फौजपूर, आणि फौजपूरचे फैजपूर झाले असावे, असे म्हणले जाते.
गाव पूर्वी छोटे होते. ‘रंगारघाटी’ हा गावातील सर्वात उंच टेकडीवजा भाग आहे. या घाटीच्या अवतीभोवती गाव वसलेले आहे. सैन्याच्या छावण्या असल्या कारणाने गावाला पूर्वी चारही बाजूंनी भिंतींची तटबंदी होती. भिंतींचे अवशेष आजही काही ठिकाणी आढळतात. गावाला ‘न्हावी दरवाजा’, ‘पिंपरूड दरवाजा’ आणि ‘शहर दरवाजा’ असे तीन दरवाजे होते. पिंपरुड दरवाजा ज्याला म्हणायचे तो दरवाजा मुख्य होता. त्याला प्रवेशद्वार असेही म्हणत. सध्या त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असून या ठिकाणाला सुभाष चौक म्हणले जाते. येथून गावात दोन बाजूंना दोन प्रमुख मार्ग जातात. त्यातील एक राम मंदिराकडे तर दुसरा मारूती मंदिराकडे जातो. पूर्वी गावाच्या एका बाजूला खंडेराव वाडी तर दुसऱ्या बाजुला गणपती वाडी होती. तेव्हा या दोन्ही वाड्यांच्या मध्ये असलेल्या या गावाचा वर्तमान काळात गावाच्या साऱ्या सिमा ओलांडून चारही दिशांना विस्तार झालेला दिसून येतो.
फैजपूर हे पूर्वी खान्देशातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या शहरांपैकी एक होते.
फैजपूरला रंगकामाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होता. रंगारघाटीत रंगारी भावसार यांनी तयार केलेला रंग खूप प्रसिद्ध होता. अजिंठा येथे जो निळा रंग आहे तो येथूनच नेला आहे, असे सांगतात. रंगारी रंग तयार करून सूत रंगवत असत. त्या सुताला सर्वत्र मागणी होती. आता तो व्यवसाय नामशेष झाला आहे. भावसार समाजाचे लोक वेगवेगळ्या व्यवसायांकडे वळले आहेत. येथील हातमागाच्या बुगडी काठांच्या खणांना परिसरातच काय, पण बाहेरगावातही मागणी असायची. घरोघर, हातमाग चालवणारे विणकर मोठ्या प्रमाणात होते. तो व्यवसाय दृष्टिदुर्लभ झाला आहे.
गावात पूर्वी जिनींग अँड प्रेसिंगचे कारखाने होते. गावात कापसाचा व सरकीचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा. त्याचप्रमाणे फैजपूर हे पूर्वी त्याच्या ऑइल मिल्ससाठीसुद्धा प्रसिद्ध होते. येथील तेल देश विदेशात निर्यात होत असे. सद्यस्थितीत त्यातील केवळ एक ऑइल मिल कार्यान्वयित असून अन्य मिल्स बंद झाल्या आहेत. बुधवारी फैजपुरात गावरान तुपाचा बाजार वाणी गल्लीत भरायचा. या भागाला आजही तूप बाजार म्हणून ओळखले जाते. फैजपूर येथे असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना हा जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात पहिले उभारला गेलेला साखर कारखाना आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पन्नासावे (५० वे) अधिवेशन हे २७ आणि २८ डिसेंबर १९३६ रोजी फैजपूर येथे करण्यात आले होते. हे अधिवेशन काँग्रेसचे प्रथम ग्रामीण अधिवेशन होते. या अधिवेशनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेससाठी फैजपूर अधिवेशन महत्त्वाचे होते. फैजपूर अधिवेशनचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते जे तत्कालीन काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते होते आणि राजमल ललवाणी त्या परिषदेचे कोषाध्यक्ष होते. या अधिवेशनात महात्मा गांधी व इतर दिग्गज नेते सुद्धा उपस्थित होते. त्या ठिकाणी आता ‘नेहरू विद्यानगर’चा परिसर आहे. तेथे धनाजी नाना विद्यालय, बी.एड. कॉलेज व फार्मसी इन्स्टिट्यूट आहेत. या अधिवेशनाचा देखावा शहरातील छत्री चौकातल्या भिंतीवर साकारण्यात आला आहे.
फैजपूर हे संत खुशाल महाराजांसाठी सुद्धा ओळखले जाते. त्या संतांच्या संदर्भात एक आश्चर्यकारक घटना लोकमानसात रूढ आहे. संत खुशाल महाराजांना देणे असलेले लखमीचंद सावकाराचे दोनशेचाळीस रुपये प्रत्यक्ष विठ्ठलाने अदा केले असे म्हणले जाते. त्यासंबंधीची १८३७ मध्ये विठ्ठलाला दिलेली मोडी लिपीतील पावतीही खुशाल महाराजांच्या मंदिरात उपलब्ध आहे!
महाराजांच्या नावाने कार्तिक महिन्यांत फैजपूर येथे रथोत्सव साजरा होतो. महाराजांचे पुत्र श्रीहरी महाराज यांनी ती प्रथा खुशाल महाराजांच्या मृत्यूनंतर, १८८५ साली सुरू केली.
खुशाल महाराजांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यात ‘श्रीदशावतार चरित्र ग्रंथ’ हा महत्त्वपूर्ण आहे. त्या ग्रंथाचे एकूण सेहेचाळीस अध्याय आहेत. खुशाल महाराजांना त्यांनी वीस अध्याय लिहिल्यावर देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव श्रीहरी महाराज यांनी सव्वीस अध्यायांची भर घालून ग्रंथ पूर्ण केला. तो ग्रंथ पितापुत्रांच्या एकात्म भावनेमुळे सलग असाच वाटतो. पांडुरंग स्वप्नात येणे, विठ्ठलाची मूर्ती सामानात येणे वगैरे कथा संत खुशाल महाराजांच्या चरित्रात आहेत. त्या कन्हैयालाल धोंडू मोरे यांनी ‘श्रीव्यासपुरी महात्म्य’ या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत.
रस्तेमार्ग
शहरातून राज्य महामार्ग क्रमांक ४ जातो, त्यामुळे फैजपूर हे रस्तेमार्गाने योग्य प्रकारे जोडले गेलेले आहे.
लोहमार्ग
फैजपूर शहरातून लोहमार्ग जात नसल्याने शहरात रेल्वे स्थानक नाही. येथून सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक हे सावदा रेल्वे स्थानक (९ कि.मी.) असून सगळ्यात जवळचे रेल्वे जंक्षन भुसावळ जंक्षन रेल्वे स्थानक (१९ कि.मी.) आहे.
वायूमार्ग
सर्वात जवळचे विमानतळ :
देशांतर्गत : जळगाव विमानतळ (४५ कि.मी.)
आंतरराष्ट्रीय : देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, इंदूर (२३० कि.मी.)
बाळ सीताराम मर्ढेकर : मराठी लेखक व कवी