बेला बोस (१ जानेवारी, १९४३:कोलकाता, भारत - २० फेब्रुवारी, २०२३) एक भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री होत्या. या १९६० आणि १९७० च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय होत्या. [१]
बोस यांचा जन्म कलकत्ता येथे एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील कापड व्यापारी होते आणि आई गृहिणी होती. बँकेने दिवाळे काढल्यावर हालात दिवस काढीत असताना हे कुटुंब १९५१ मध्ये मुंबईला स्थलांतरित झाले. रस्त्याअपघातात वडिलांच्या मृत्यूनंतर बोस यांनी अर्थार्जनासाठी शाळेत असतानाच चित्रपटांमध्ये समूहनर्तिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली आण शालेय शिक्षण संपल्यानंतर अधिक चित्रपटांमध्ये कामे घेतली.
बोस यांना १९५० च्या उत्तरार्धापासून स्वतंत्र नाव मिळू लागले. १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या मैं नशे में हूं चित्रपटात राज कपूरसोबत केलेल्या नाचाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. बोस यांची पहिली प्रमुख भूमिका वयाच्या २१व्या वर्षी सौतेला भाई (१९६२) मध्ये गुरू दत्त बरोबर होती. बोसने बंगाली नाटकांतून तिच्या अभिनय कौशल्याचा सराव केला. त्यांचा कारकीर्दीत त्यांनी १५०हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. हवा महल (१९६२) मध्ये त्यांनी हेलनच्या बहिणीची भूमिका साकारली होती. [२] त्यांना खलनायिकेच्या अनेक भूमिका मिळाल्या. आपल्या पारंपारिक विचारांमुळे त्यांनी पडद्यावर तोकडे कपडे घालण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी काही भूमिका गमावल्या. [३]
बोस यांनी आशिष कुमार या अभिनेत्याशी १९६७मध्ये लग्न केले. [४] आणि एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिल्यानंतर हळूहळू त्यांनी चित्रपटांपासून निवृत्ती घेतली.
बोस यांचे २० फेब्रुवारी २०२३ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले [५]