भंवरी देवी | |
---|---|
जन्म |
भंवरी देवी १९५१/५२ राजस्थान |
मृत्यू |
अज्ञात |
मृत्यूचे कारण | सामूहिक बलात्कार |
निवासस्थान | भाटेरी, राजस्थान |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | सामाजिक कार्यकर्त्या |
ख्याती | विशाखा खटला |
जोडीदार | मोहनलाल प्रजापत |
पुरस्कार | नीरजा भनोत पुरस्कार (त्यांच्या "असाधारण धैर्य, दृढनिश्चय आणि वचनबद्धते" साठीचा स्मृती पुरस्कार |
भंवरी देवी तथा बहवेरी देवी या राजस्थानच्या भाटेरी येथील एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांमुळे भडकलेल्या पुरुषांनी भंवरी देवी यांच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक आणि न्यायालयाने आरोपींची केलेली निर्दोष मुक्तता यांमुळे या प्रकरणाकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले.[१][२] ही घटना भारतातील महिला हक्कांच्या चळवळीतील अतिशय महत्त्वाचा भाग बनली.[३][४][५]
भंवरी देवी या जातीच्या कुंभार कुटुंबातील होत्या. त्या भारताच्या राजस्थानातील भाटेरी गावात राहत होत्या. हे गाव राज्याची राजधानी असलेल्या जयपूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे. गावातील बहुतेक लोक दूधवाल्यांच्या गुर्जर समाजाचे होते, जे भंवरीच्या जातीपेक्षा उच्च मानली जाते. १९९० च्या दशकात गावात बालविवाह सर्रास होत होते, तसेच जातिव्यवस्था प्रबळ होती. भंवरी यांचा विवाह मोहनलाल प्रजापत यांच्याशी झाला होता. त्यावेळी त्या फक्त पाच किंवा सहा वर्षांच्या होत्या आणि त्यांचा नवरा आठ किंवा नऊ वर्षांचा होता.
त्यांना चार मुले झाली; दोन मुली आणि दोन मुलगे. यापैकी मोठी मुलगी शिकली नाही; जयपूरमध्ये राहणारे दोन मुलगे किरकोळ नोकऱ्या करतात, तर धाकटी मुलगी रामेश्वरी हिने शिक्षणशास्त्राची (बी.एड.) पदवी घेतली असून ती एका शाळेत इंग्रजी भाषा शिकवते.