भाऊराव पाटील | |
---|---|
जन्म |
सप्टेंबर २२, इ.स. १८८७ कुंभोज, महाराष्ट्र |
मृत्यू |
मे ९, इ.स. १९५९ |
टोपणनावे | कर्मवीर |
पेशा | समाजसुधारणा, शिक्षणप्रसार |
प्रसिद्ध कामे | रयत शिक्षण संस्था |
मूळ गाव | कुंभोज, महाराष्ट्र |
पुरस्कार | पद्मभूषण (१९५९) |
कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर १८८७ - ९ मे १९५९) हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.
भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहुजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव (पद) भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत, ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत. [१]
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर (कृतींचा राजा) ही उपाधी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि १९८८ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला.
कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे.कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर 1887 रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.कर्मवीरांच्या गावी कुंभोज मध्ये 'सत्त्यापाचे बंड'हे प्रकरण खुप गाजले होते.कुंपणाच्या काट्या तोडणाऱ्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले.सत्त्याप्पा भोसलेला त्याचा सात्त्विक संताप आला.रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले.व तो फारारी झाला.तो कार्मावीर अण्णाच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला.छोट्या भाऊरावाना तो अंगाखांद्यावर खेळवी.तोकर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे.बंडखोरी,'अन्यायाविरुद्ध चीड हे सदगुण सत्त्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले. त्यांच्या बालपणी सार्वजनिक ठिकाणी पाणी भारता येत नसे.
इतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे.पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागे. एकदा ते दृष्यपाहून अण्णाचे हृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी राहाठ मोडून आडात टाकला.कार्मावीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले.विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रगीचे शिक्षण झाले.तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले.कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहूदलितांना महाराज होते.भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता.त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला.सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले.समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ 'युनियन बोर्डींग'ची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. १९३५ मध्ये 'महात्मा फुले अध्यापक विद्यालय' त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.
एकदा कर्मवीर् सुट्टीत इस्लामपूरला आले.त्यावेळी कार्मावीरांचे आई वडील तिथे राहत होते.रिकाम्या वेळेतकर्मवीर शाळेकडे गेले.पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता.सर्व मुले वर्गात बसलेली होती.आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता.गुरुजीना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले.ते त्या मुलाला घरी घेऊन आले.घरात स्वताजाव्ल बसूनच जेऊ घातले.नंतर कोल्हापूरला नेऊन 'मिस क्लार्क होस्टेल'लादाखल केले.तो पुढे तो विधीमंडळाचा सभासद झाला.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या 'मूकनायक'वर्तमान पत्राचा तोकाही काल तो संपादक होता.इतर जातीचा मुलगा घरात आणल्याने कर्मवीरांच्या आई ने त्यांना फुंकनीने मारले.फुंकनीचा मार वाया गेला नाही.पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली.अण्णा हायस्कुला असताना होते. पण त्यांन रस नव्हता.[२]
पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची दारेघेऊन जाण्यासाठी त्यांनी रयतशिक्षण संस्थेची स्थापना केली.मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी 'कमवा व शिका' ही योजना सुरू केली.महाराष्ट्रात ४ जिल्यात व कर्नाटक राज्यात मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक,२७ प्राथमिक,४३८माध्यमिक,८ आश्रमशाळा,८ अध्यापक विद्यालय,२ आय.ट.आय,व ४१ महाविध्यालायांचा समावेश आहे.अशा या शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टो १९१९ रोजी केली.
दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. या संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना साताऱ्यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.
त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.[३] रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत. त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक, २७ प्राथमिक, ४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय, २ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.
ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.
रयतगीत-
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||
कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्त्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||
गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवूनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||
दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||
जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... गीतकार - विठ्ठल वाघ