भारिप बहुजन महासंघ | |
---|---|
अध्यक्ष | प्रकाश आंबेडकर |
संस्थापक | प्रकाश आंबेडकर |
स्थापना | ४ जुलै १९९४ |
विघटन | ८ नोव्हेंबर २०१९[१] |
धर्म | बौद्ध |
रंग | निळा |
http://www.bharip.org/ |
भारिप बहुजन महासंघ (भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघ) हा भारतातील एक राजकीय पक्ष होता. प्रकाश आंबेडकर यांनी ४ जुलै १९९४ रोजी या पक्षाची स्थापना केली असून ते या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. हा पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष होता.[२]
भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघ पक्षाचा ध्वज, चार विविध रंगाच्या समान लांबीच्या व समान रूंदीच्या पट्या असून त्यापैकी निळी पट्टी झेंड्याच्या डाव्या बाजूला उभी जोडली असून त्या उभ्या निळ्या पट्टीला वर केशरी, मध्यभागी पांढरी व खाली हिरवी पट्टी अशा तीन पट्टया आडव्या पद्धतीने जोडलेल्या आहेत. मध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीवर उजव्या हाताची बंद मूठ अंकीत केलेली आहे. निळा रंग हा विशाल आकाशाचा रंग असून भगवा रंग हा तुकोबाच्या बहुजन समाजाचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा निसर्गाचा आहे व पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे. यांचे अर्थ म्हणजे, प्रचंड प्रमाणात सामाजिक व राजकीय शोषण झालेल्या व विशाल भूतलावर वास करणाच्या तुकोबाच्या बहुजन समाजाला गुलामीचे सगळे बांध झुगारून उंच आकाशात स्वच्छंदीपणे प्रगती व विकासाची भरारी मारावयाची आहे. आपल्या आयुष्यातील हे परिवर्तन पांढरा रंग व प्रतिक असलेल्या शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने बहुजन महासंघाच्या माध्यमातून घडवून आणावयाचे आहे. व यासाठी संत तुकारामाच्या बहुजन समाजाचे भक्कम सामाजिक व राजकीय एकीकरण करण्याचे निश्चित केले आहे. आणि त्यासाठीच बहुजन महासंघाने आपल्या एकतेचे व शक्तीचे प्रतीक म्हणून उजव्या हाताची बंद मूठ ध्वजावर अंकीत करून घेतली आहे.[३]
भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघाला स्वतःची अशी एक विचारप्रणाली आहे. या विचारप्रणालीला अनुसरून पक्षाने आपले ध्येय आणि उद्दिष्ट्ये ठरविले आहेत. वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यांमधून व ठरावांमधून ते प्रतित झालेले आहेत. ते खालीलप्रमाणे;
१) भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघाने राज्यातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणा-या समाजघटकांची प्रगती करणे, त्यांना सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात न्याय संपादन करून देण्यासाठी प्रयत्न करणे हे पक्षाने उद्दिष्ट मानले असल्याचे आढळते.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बौद्ध झालेल्या दलितांना त्यांच्या सवलती कायम राहाव्या या मागणीसंबंधी उद्दिष्ट ठरविण्यात आले.
३) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजघटकांना सवलती देण्यात याव्या यासाठी केंद्रसरकारने नेमलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी शासनाने ताबडतोब करावी हे ध्येय पक्षाने ठरविले.
४) औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ' असे नामांतर करणारा ठराव महाराष्ट्र शासनाने संमत केला असतानादेखील त्याची अंमलबजावणी केली नाही. हा ठराव ताबडतोब अंमलात आणला जावा यासंबंधी मागणी करणे हे उद्दिष्ट ठरविले.
५) दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात सरकारला अपयश येत असल्याने, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
६) ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये लोकांचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले. या स्थलांतरित लोकांना राहण्यासाठी पडिक व ओसाड जागेवर त्यांनी झोपड्या बांधून निवारा मिळविला. अशा झोपडपट्टया उठवून तेथे इमारती उभ्या करण्यासाठी गुत्तेदारांनी शासनाला हाताशी धरून त्याचे कटकारस्थान वाढले. ते हाणून पाडण्यासाठी झोपडपट्या नियमित करणे त्यांना संरक्षण मिळवून देणे व तेथे विकास घडवून आणण्याचा उद्देश पक्षाने ठरविला.
७) जात, धर्म, वंश, भाषा, पंथ व लिंग इत्यादी बाबत कोणताही भेदभाव न करता या सर्व समाजघटकांची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे.
८) समाजातील अनुसूचित जाती अनुसूचितजमाती ओबीसी समाज, अल्पसंख्यांक समाजाला व उपेक्षित समाजाला संघटित करून या समाजघटकांना राजकीय सत्ता मिळवून देण्यासंबंधीचे उद्दिष्ट पक्षाने ठरवले.
९) कोणताही प्रश्न हाताळत असताना अथवा त्यासंबंधी संघर्ष करत असताना लोकशाहीच्या शांततामय व सनदशीर मार्गाचा अवलंब करणे व देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येणार नाही याची काळजी घेणे हे पक्षाने उद्दिष्ट मानले.
१०) देशातील वाढत्या जातीयवादाला व जमातवादाला प्रखरपणे विरोध करणे व समताधिष्ठीत समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
११) ओबीसी समाजाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी या समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबतचा व विविध क्षेत्रात सवलती देण्याबाबतचा पुरस्कार करणे.
१२) राज्यामध्ये राजकीय सत्तेत घराणेशाही वाढत आहे. त्यामुळे प्रस्थापितांचे वर्चस्व वाढत आहे. याला सर्वतोपरी विरोध करण्याचे उद्दिष्ट पक्षाने स्वीकारले.
१३) बहुसंख्येने शोषित, पिडित जनता असलेल्या या देशात आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. या आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणाला आळा घातला जावा यासाठी पक्षाने आर्थिक सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर दिला.
१४) महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे त्यांना आपण या देशात असुरक्षित असल्याचे जाणवत आहे. त्यांना संघटित करून त्यांच्यातील भिती नष्ट करणे, त्यांना पुरुषांप्रमाणे समान हक्क प्रस्थापित करणे व कायद्याने सर्व बाबतीत समान दर्जा प्रदान करणे हे ध्येय पक्षाने ठरविले.
१५) राज्यातील अतिरिक्त पडित जमीन उपयोगात आणली जावी यासाठी ती जमीन भूमिहिन शेतमजूरांना वाटप करावी अशी मागणी करणे.
१९९९ मध्ये, प्रकाश आंबेडकर हे १३व्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडूण आले होते.
या पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभांवरील निवडूण आलेले उमेदवार[४][५]
वंचित बहुजन आघाडी हा प्रकाश आंबेडकर यांनी २०१८ मध्ये नवीन पक्ष स्थापन केला आहे. १४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.[१३][१४][१५][१६] ८ नोव्हेंबर २०१९ रोजी भारिप बहुजन महासंघ हा वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करण्यात आला.[१७]