मंगेश पाडगांवकर

मंगेश पाडगांवकर
जन्म नाव मंगेश केशव पाडगांवकर
जन्म मार्च १०, इ.स. १९२९
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र)
मृत्यू डिसेंबर ३०, इ.स. २०१५
राष्ट्रीयत्व मराठी-भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन
साहित्य प्रकार कविता
वडील केशव आत्माराम पाडगांवकर
आई रखमाबाई केशव पाडगावकर
पत्नी यशोदा पाडगांवकर
अपत्ये पुत्र: अजित, अभय पाडगांवकर; कन्या : अंजली कुलकर्णी
पुरस्कार महाराष्ट्भूषण पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०)

मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जीवन

[संपादन]
मंगेश पाडगांवकर यांच्या लग्नाचे दुर्मिळ चित्र

पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठीसंस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.

मंगेश पाडगांवकरांचे अनुवादित साहित्यातील योगदान

[संपादन]

साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी 'कथारूप महाभारत' या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.[ संदर्भ हवा ]

त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७ अमेरिकन साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’- [वादळ] या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.[ संदर्भ हवा ]

पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या पटावर ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकाचा प्रवेश १९६५ साली झाला. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले असून त्याला काकासाहेब कालेलकर यांची सविस्तर प्रस्तावना आहे. त्यात मीराबाईच्या चरित्राविषयी, तिचे भावजीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हणले आहे.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
साहित्यकृती साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशन वर्ष (इ.स.) आवृत्ती
अफाटराव इ.स. २०००
आता खेळा नाचा इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६
आनंदऋतू कवितासंग्रह इ.स. २००४
आनंदाचे डोही कवितासंग्रह
उदासबोध (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९४ १९९५, १९९६, १९९८, २००२, २००५
उत्सव (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६२ १९८९, २००१, २००६
कबीर (कवितासंग्रह)
(कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
कवितासंग्रह इ.स. १९९७ २०००, २००३, २००५
कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००२, २००६
द काॅज (अनुवादित) निबंधसंग्रह मूळ पुस्तक, अमेरिकेचे उपाध्यक्ष ह्यूबर्ट एच. हंफ्री यांचे The Cause of Mankind
काव्यदर्शन (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६२
गझल (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८१ १९८९, १९९७, २०००, २००४
गिरकी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स.
चांदोमामा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५
छोरी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५७ १९८८, १९९९, २००३
जिप्सी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५३ १९५९, १९६५, १९६८, १९७२, १९८६, १९८७, १९९३, १९९४, १९९५, १९९७, २००१, २००३, २००५
ज्युलिअस सीझर (नाटक)(विल्यम शेक्सपियरच्या 'जुलियस सीझर' या नाटकाचे मुळाबरहुकूम भाषांतर) नाटक इ.स. २००२ २००६
झुले बाई झुला इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६
तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८९ १९९१, १९९६, १९९८, २००१, २००३, २००४
तृणपर्णे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स.
त्रिवेणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९५ २००४
धारानृत्य (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५० २००२
नवा दिवस इ.स. १९९३ १९९७, २००१
निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह) ललितलेख इ.स. १९५४ १९५८, १९९६
फुलपाखरू निळं निळं इ.स. २०००
बबलगम इ.स. १९६७
बोलगाणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९० १९९२, १९९४, १९९६, १९९७, १९९९, २०००, २०००, २००१, २००२, २००३, २००३, २००४, २००४, २००५, २००६
भटके पक्षी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८४ १९९२, १९९९, २००३
भोलानाथ कवितासंग्रह इ.स. १९६४
मीरा (कवितासंग्रह)
(मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
कवितासंग्रह इ.स. १९६५ १९९५, १९९९, २००३
मुखवटे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००६
मोरू (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००६
राधा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००० २००३
रोमिओ आणि ज्युलिएट
(विल्यम शेक्सपियरच्या 'रोमिओ आणि ज्युलिएट' या नाटकाचे मुळाबरहुकूम भाषांतर)
नाटक इ.स. २००३
वाढदिवसाची भेट इ.स. २०००
वात्रटिका (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६३ १९९९, २००२, २००४
वादळ ( नाटक) नाटक इ.स. २००१
विदूषक इ.स. १९६६ १९९३, १९९९, २००३
वेड कोकरू कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५
शब्द कवितासंग्रह
शर्मिष्ठा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६० २००३
शोध कवितेचा कवितासंग्रह
सलाम (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९७८ १९८१, १९८७, १९९५, २००१, २००४, २००६
सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००
सूर आनंदघन (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००५
सूरदास (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००४
क्षणिका कवितासंग्रह

मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता

[संपादन]
  • अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
  • अफाट आकाश
  • असा बेभान हा वारा
  • आतां उजाडेल
  • आम्लेट
  • जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
  • दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
  • नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
  • प्रत्येकाने आप-आपला चंद्र निवडलेला असतो
  • फूल ठेवूनि गेले
  • मी आनंदयात्री
  • मी बोलले न काही नुसतेच पाहिले
  • सलाम
  • सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
  • सांगा कसं जगायचं
  • सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
  • टप टप करति आंगावरति प्राजक्ताची फुले

पापड कविता

[संपादन]

एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता 'लिज्जत'ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, 'आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?' पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पावसाळ्यात पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतलाही ही जाहिरात लाभदायी वाटली असावी. पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि हा क्रमच झाला. पापड, पाडगावकर, पाऊस आणि प्रायोजक (बडोदा बँक) यांची ही युती दीर्घकाळ टिकली.[ संदर्भ हवा ]

पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागू लागली. लिज्जत पापडाच्या जाहिरातीबरोबरच ही कविता छापली जायची. मंगेश पाडगावकरांच्या हस्ताक्षरांत छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणाऱ्या या कवितेला साजेशी अशी निसर्गचित्राची प्रसन्न महिरप असे. कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफ्फेदार पण सर्व अक्षरे स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी असे. दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता, पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगे-मागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची, टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.

पाडगावकरांच्या काही नमुनेदार पाऊस-कविता

[संपादन]

१. रिमझिम पावसात जाऊ गं,
गुण गुण गाणे गाऊ गं,
थेंब टपोरे आले गं,
सगळे गोकुळ न्हाले गं,
थुइथुइ नाचत न्हाऊ गं ||

२. निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान;
ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान.
काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा;
एकाएकी कोसळला पाऊस मधाचा ||

३. या मेघांनो आभाळ भरा
या धरतीवर अभिषेक करा
विहंगाचे मधुगान हरपले
या मातीचे श्वास करपले ||
वाहु दे सुखाचा पुन्हा झरा
सुकून गेल्या वनांवनांवर
सचिंत झाल्या मनांमनांवर
करुणेची संतत धार धरा ||

एखाद्या नव्याकोऱ्या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू व्हावा, हे मराठीत प्रथमच घडत होते. पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडला नाही.

मंगेश पाडगावकरांचे काव्यवाचन

[संपादन]

साहि्त्य संमेलनांत कवि संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमधी आपल्या कविता ऐकवतो. परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा.भ. बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे कमीच.

वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की, ज्या गावात त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असे, तिथे रसिक जथ्थ्या- जथ्थ्याने येत. काव्यरसिकांवर गारुड करणारी एक अजब बेहोषी या तिघांच्या काव्यवाचनात असायची. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती.

इ.स. १९९० च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' म्हणणा‍रे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे.

प्रत्येकाची वेगळी शैली

[संपादन]

बापट-पाडगावकर-करंदीकर या त्रिकुटाने १९५३पासून आपल्या कवितांचे एकत्र वाचन करण्याची प्रथा पाडली आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैलीही निर्माण केली. काव्यवाचनात या तिघांनी मारलेली बाजी बघून नंतरनंतर आयोजकच या तिघांना एकत्रितपणे बोलवायला लागले आणि काव्यवाचनाची एक वेगळी परंपराच महाराष्ट्रात रुजली. या तिघांनी एकत्र काव्यवाचन करण्याच्या या कल्पनेला 'पॉप्युलर प्रकाशन'च्या 'काव्यदर्शन' या उपक्रमाने अधिक बळ दिले. या उपक्रमाच्या पूर्वार्धात बापट-पाडगावकर-करंदीकर हे तिघेही केशवसुत-बालकवी अशा आपल्या पूर्वसुरींच्या कविता वाचायचे; तर उत्तरार्धात स्वतःच्या निवडक कविता वाचायचे. हा कार्यक्रमही लोकांनी डोक्यावर घेतला. त्यातून या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करायचे असे ठरले. परंतु तिघांच्या वेळांची जुळवाजुळव करताना तिरपीट व्हायची. त्यात करंदीकर काही वर्षांसाठी परदेशात गेले आणि हा उपक्रम बंदच पडला. मात्र करंदीकर परत आल्यावर तिघांच्या एकत्रित काव्यवाचनाच्या कल्पनेने पुन्हा उचल घेतली. मात्र यावेळी फक्त स्वतःच्याच कविता वाचायच्या, असे नक्की करण्यात आले. त्यानंतर बापट-पाडगावकर-करंदीकर त्रयीचा काव्यवाचनाचा वारू मराठी मातीत तब्बल चाळीस-पन्नास वर्षं दौडत राहिला, तो एकेकजण गळेपर्यंत.

पैसे मोजून काव्यश्रवण

[संपादन]

बापट-पाडगावकर-करंदीकर या तिघांच्याही काव्याचे रूप एकमेकांपेक्षा वेगळे होते. वसंत बापटांची कविता संस्कृतप्रचुर आणि रोमॅन्टिक होती, पाडगावकरांची कविता भावकविता होती, तर विंदांची कविता या दोघांपेक्षा वेगळी, म्हणजे केंद्रस्थानी माणूस असलेली वास्तववादी होती. परंतु वेगळ्या धाटणीच्या तीन शैली एकत्र ऐकायला मिळत असल्यामुळे रसिक त्यांच्या काव्यवाचनाला आवर्जून हजेरी लावायचे. त्यांच्या या काव्यवाचनाच्या यशाचे गमक त्यांच्या काव्यवाचनाच्या शैलीतही होते. वसंत बापटांचा आवाज काहीसा पिचका होता. पण त्यांच्यात नट दडलेला असल्यामुळे 'सुपारी' किंवा 'अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ'सारख्या कविता ते म्हणायचे, तेव्हा रसिकांसमोर ती कविता दृश्यमान व्हायची. विंदांचा आवाज त्यांच्या कवितेसारखाच टोकदार होता; त्यामुळे त्या आवाजात 'धोंड्या न्हावी' किंवा 'ती जनता अमर आहे'सारखी कविता ऐकताना एकदम भारून जायला व्हायचे. तर कवितावाचन करताना मंगेश पाडगावकर एकदम खर्जातला आवाज लावायचे. या आवाजात 'सलाम' किंवा 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून'सारख्या कविता म्हणताना त्यांचा एकदम आश्वासक सूर लागायचा. या वैशिष्ट्यांमुळेच या त्रयीने मराठी र‌सिकांवर अक्षरशः अधिराज्य गाजवले. विशेष म्हणजे पैसे मोजून घेऊन मग आपली कविता ऐकवायची सवय या तिघांनीच महाराष्ट्राला लावली.

गौरव

[संपादन]
  • अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०
  • अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ गृह मंत्रालय, भारत सरकार (२५ जानेवारी २०१३). "Padma Awards Announced" (इंग्रजी भाषेत). पत्र सूचना कार्यालय, भारत सरकार. ६ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]