मदनलाल धिंग्रा

मदनलाल धिंग्रा

मदनलाल धिंग्रा
जन्म: सप्टेंबर १८, इ.स. १८८३
अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत
मृत्यू: ऑगस्ट १७, इ.स. १९०९
पेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन, इंग्लंड
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अभिनव भारत
होमरूल लीग
धर्म: हिंदू
प्रभाव: विनायक दामोदर सावरकर


मदनलाल धिंग्रा (१८ सप्टेंबर १८८३ – १७ ऑगस्ट १९०९) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

मदनलाल धिंग्रा यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.

मदनलाल धिंग्रा

सावरकरांशी संबंध

[संपादन]

मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.[ संदर्भ हवा ]

कर्झन वायलीचा खून

[संपादन]

ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोसकन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या[]; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता.[] या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.

शेवटचे वक्तव्य

[संपादन]

फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात मदनलाल धिंग्रा यांनी असे म्हणले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे. ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे. याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."[]

नाटक

[संपादन]

मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे. [ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ सुवर्णकलश / Suvarna Kalash. Ramakrishna Math, Nagpur. 2018-06-02. ISBN 9789388071819.
  2. ^ Phadke, Y. D. (1984). Śodha Sāvarakarāñcā. Śrīvidyā Prakāśana.
  3. ^ सुवर्णकलश / Suvarna Kalash. Ramakrishna Math, Nagpur. 2018-06-02. ISBN 9789388071819.