म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय सुरुवातीला मळेकर वाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूत होते. त्यानंतर ते टिळक रोडवर नव्याने बांधलेल्या इमारतीत आले. या इमारतीत ‘माधवराव पटवर्धन सभागृह’, एक ग्रंथालय आणि त्यातच ‘कै.वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालय’ आहे. इमारतीच्या तळघरात खासगी संस्था पुस्तक प्रदर्शने भरवतात.
मसापच्या कार्यकारी मंडळाचे सभासद, पत्रिकेचे संपादक आणि १९३६ साली जळगावला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशा त्रिविध नात्यानी प्रसिद्ध कवी माधव जूलियन तथा माधवराव पटवर्धन यांचे २९ नोव्हेंबर १९३९ रोजी पुण्यात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सारा महाराष्ट्र हळहळला. मसापने त्यांचे यथोचित स्मारक करण्याची योजना आखून निधी गोळा करण्यास प्रारंभ केला. साहित्यिक वि.द. घाटे आणि रावसाहेब रघुवेल लुकस जोशी या दोघांच्या विशेष प्रयत्नांमुळे संकल्पित निधी जमला. फलटणचे मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी या सभागृहासाठी ३५०० रुपयांची देणगी दिली आणि २९ नोव्हेंबर १९४१ रोजी माधवराव पटवर्धन सभागृहाची कोनशिला साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांच्या हस्ते बसविण्यात आली. या सभागृहातील भिंतीवर सभागृहाच्या दर्शनी भागात लावलेले आणि नी.म. केळकर यांनी रेखाटलेले माधवराव पटवर्धन यांचे तैलचित्र आहे. त्याशिवाय भिंतींवर आजवरच्या सर्व साहित्य संमेलनाध्यक्षांची समान आकारमानाची छायाचित्रे लावली आहेत.
मसापचे फक्त आजीव सभासदत्व मिळते. इतर कोणत्याही प्रकारचे सदस्यत्वाची सोय नसल्याने खर्च विचारात घेता, फक्त लहान वयाची किंवा अगदी तरुण मंडळीच सभासद होण्याची इच्छा करतात.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या गांवोगांवी आणि परदेशांतही शाखा आहेत. महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते.
मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे 'मसाप'चे कार्यक्षेत्र आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात ६५ शाखा आहेत. त्यापैकी केवळ २० शाखांचे कामकाज नियमित सुरू असावे. 'मसाप'च्या आजीव सभासदत्वासाठी मिळणाऱ्या शुल्कातील ४० टक्के रक्कम ही शाखांना दिली जाते. त्याचप्रमाणे विभागीय साहित्य संमेलनासाठी ५० हजार रुपयांचा निधी दिला जातो. शाखा मेळाव्यासाठी पूर्वी असलेल्या २५ हजार रुपये निधीची तरतूद वाढवून ४० हजार करण्यात आली आहे. काही संस्था तांत्रिकदृष्ट्या शाखा नसल्या तरी त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.
कार्यकारिणीवरील व्यक्तींना आपल्या पदाविषयी माहिती नसणे, आर्थिक गैरव्यवहार तसेच तेवीस वर्षे निवडणूक न होणे, अशा तक्रारी असतानाही कारभार करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेची कार्यकारिणी २८ ऑगस्ट, २०१६ रोजी बरखास्त करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सातारा शाखेच्या निमित्ताने सर्व शाखांची झाडाझडती करण्यात येणार असून, पुढील तीन महिन्यांत आर्थिक व कार्यविषयक अहवाल सादर करण्याच्या सूचना सभेत करण्यात आल्या.
परिषदेच्या सातारा शाखेची १९९३पासून निवडणूक झालेली नाही. मधुसूदन पत्की २०१२ पासून या शाखेचे अध्यक्ष असून, अकरा लोकांची कार्यकारिणी आहे. मात्र, यातील अनेकांना आपण कार्यकारिणीमध्ये आहोत हेच माहीत नसल्याचे समोर आले आहे. तसेच, शाखेने १९९३पासून बैठकीचे इतिवृत्त, हिशेब सादर केलेला नाही. परिषदेच्या पावतीपुस्तकाचा वापर करण्यात आला असून, रक्कम अद्याप जमा झालेली नाही. अशा तक्रारींवरून निरीक्षक राजन लाखे यांनी कार्यकारिणीशी पत्रव्यवहार केला. या प्रकरणाचे पडसाद बैठकीत उमटले. त्यानुसार सातारा शाखेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सातारा शाखेच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेला घटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर १९१२ मध्ये अकोला येथे झालेल्या संमेलनामध्ये परिषदेचे मुखपत्र असावे हा निर्णय घेण्यात आला. मराठी वाङ्यमातील नवे प्रवाह आणि समीक्षा यांचा वेध घेण्याच्या उद्देशातून परिषदेतर्फे १९१३ मध्ये महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे मुखपत्र सुरू करण्यात आले. सुरुवातीची बारा वर्षे हे मुखपत्र मासिक स्वरूपात निघत होते आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाला जोडून वितरित केले जात होते. त्यावेळी ना.गो. चापेकर, माधवराव पटवर्धन, के. नारायण काळे, यशवंत पेंढरकर, डॉ. वि.भि. कोलते, दि.के. बेडेकर, श्री.के. क्षीरसागर, स.गं. मालशे, डॉ. भालचंद्र फडके, डॉ. हे.वि. इनामदार, वि.मो. महाजनी, वा.गो. आपटे अशा दिग्गजांनी पत्रिकेचे संपादक म्हणून काम पाहिले आहे.
स्वतंत्रपणे प्रसिद्ध होऊ लागलेल्या ’साहित्य पत्रिके’चे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार हे पहिले संपादक होते. साहित्यसम्राट न.चिं. केळकर, श्री.म. माटे, रा.श्री. जोग, रा.शं. वाळिंबे, वसंत स. जोशी, शंकर सारडा, ह.ल. निपुणगे अशा दिग्गजांनी पत्रिकेच्या संपादकत्वाची धुरा सांभाळली आहे. २००४पासून सु. प्र. कुलकर्णी संपादक म्हणून काम पाहू लागले. २०१७ साली पुरुषोत्तम काळे हे संपादक आहेत.. भारत छोडो आंदोलन, स्वातंत्र्यप्राप्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन या चळवळींसह स्त्री सुधारणा, अस्पृश्यता निवारण, बुद्ध धर्म तत्त्वज्ञान असे विविध राजकीय आणि सामाजिक विषयांचे प्रतिबिंब या साहित्य पत्रिकांच्या अंकांमध्ये उमटलेले आहे. साहित्य पत्रिकेमध्ये आपले लेखन प्रसिद्ध होणे हा त्या लेखक आणि प्राध्यापकाचा बहुमान समजला जातो.
१० ऑक्टोबर २०१३ रोजी माजी खासदार यशवंतराव गडाख आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. द.भि. कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये शताब्दीपूर्ती अंकाचे प्रकाशनझाले. हा ४८वा अंक होता. साहित्य क्षेत्रातील आद्य संस्था हा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या त्रैमासिक मुखपत्राला ‘इंटरनॅशनल स्टॅंडर्ड सीरियल नंबर’ (आयएसएसएन) मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या नामावलीमध्ये समावेश झाला आहे. (२४ मे २०१७ची बातमी). २४५६-६५६७ हा तो आयएसएसएन क्रमांक आहे. महारष्ट्र साहित्य परिषदेचा १११ वा वर्धापनदिन शनिवारी (२७ मे २०१७) साजरा होत असताना हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्याने परिषदेला एक जागतिक बहुमान लाभला असल्याची भावना व्यक्त केली गेली.
‘अक्षरयात्रा’ हे साहित्य महामंडळाच्या नागपूर शाखेतून प्रसिद्ध होणारे प्रकाशन आहे. विलास चिंतामण देशपांडे संपादक आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते.
त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात. उदा० मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी कथाकथनकार संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली १०वे ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने खालील संमेलने घेतली आहेत/जातात. :
महाराष्ट्रात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१७ पर्यंत झालेली अशी संमेलने :
मराठी वाङ्मय पुरस्कारांमधून सरकारने तब्बल ५३ साहित्यिकांच्या नावाने सुरू असलेले पुरस्कार बंद केले आहेत.
मराठीत, साहित्य क्षेत्रात ज्यांच्या स्मृती कायम जपून ठेवाव्यात, अशा आचार्य अत्रे, गाडगे महाराजपु. ल. देशपांडे, लोटू पाटील, वि. वा. शिरवाडकर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. सलीम अली, अशा अनेकांची नावे त्यामुळे या स्मृती पुरस्कारांतून वगळली आहेत. साहित्यिकांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले होते. यात काहींच्या नावाचे पुरस्कार बंद करून, ते दुसऱ्यांच्या नावाने सुरू करण्यात आले आहेत.
इंदिरा संत, संत तुकडोजी महाराज, बॅरिस्टर नाथ पै, बी. रघुनाथ, भा. रा. तांबे, यशवंतराव चव्हाण, वा. ल. कुलकर्णी, विठ्ठल रामजी शिंदे, अशा अनेकांच्या नावाचे पुरस्कार शासनाने पुरस्कारांसाठी साहित्य मागविलेल्या आवाहनामध्ये आता दिसून येत नाहीत.गेल्या वर्षीपासून शासनाने पुरस्कारांची रक्कम २०,००० हजारावरून तब्बल १ लाखांवर नेली. मात्र, हे करीत असताना पुरस्कांरांच्या संख्येला कात्री मारत ती संख्या ७९ वरून अवघी ३५ वर आणली आहे. हे करताना अनेक मान्यवरांच्या नावांना शासनाने स्मृती पुरस्कारांमधून फाटा दिला आहे.
मराठी साहित्य पुरस्काराच्या यादीतून वगळलेले स्मृती पुरस्कार
(१) अण्णासाहेब किर्लोस्कर (नाटक), (२) शाहीर अमरशेख, (३) आचार्य अत्रे (विनोद), (४) इंदिरा संत (काव्य), (५) उद्धव ज. शेळके (कादंबरी), (६) डॉ. एन. आर. तावडे (भौतिकशास्त्र व तंत्रविज्ञान), (७) कुसुमावती देशपांडे (समीक्षा व सौंदर्यशास्त्र), (८) कृष्णराव भालेकर (संकीर्ण), (९) ग.त्र्यं. माडखोलकर (संशोधन), ग.ह. पाटील (चरित्रे), गाडगे महाराज (आधारित) (संपादित व आधारित या विभागात रा. ना. चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे.), गोपीनाथ तळवळकर, जयवंत दळवी (एकांकिका), (१४) महात्मा ज्योतीराव फुले (इतिहास) (फुले यांच्या नावाने असलेल्या इतिहासावरील पुरस्काराऐवजी शाहू महाराजांच्या नावे हा पुरस्कार आता आहे), संत तुकडोजी महाराज (ललितविज्ञान), कवी दत्त, दत्तू बांदेकर (विनोद), दादासाहेब धनवटे (एकांकिका), दादोबा पांडुरंग (भाषाशास्त्र व व्याकरण), (२०) दि. के. बेडेकर (ललित गद्य), धनंजय कीर (चरित्र), डॉ. धनंजयराव गाडगीळ (अर्थशास्त्र), नरहर कुरुंदकर (समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र), ना. गो. कालेलकर, बॅरिस्टर नाथ पै (राज्यशास्त्र व समाजशास्त्र), ना. धो. ताम्हणकर (बाल कादंबरी), क्रांतिसिंह नाना पाटील (इतिहास), (२८) रेव्हरंड ना. वा. टिळक, पु. भा. भावे (लघुकथा), बी. रघुनाथ (लघुकथा), भा. रा. तांबे, मधुकर केचे (ललितगद्य), मामा वरेरकर (एकांकिका), यशवंतराव चव्हाण (आत्मचरित्र), र. धों कर्वे (ललितविज्ञान), राजा केळकर (सर्वसामान्य ज्ञान), रा. ना. चव्हाण (संपादित), (३८) राम गणेश गडकरी, लोटू पाटील (नाटक), वा. गो. आपटे (नाटक व एकांकिका), वा. गो. मायदेव (कविता), वा. रा. कांत (अनुवादित), वा.ल. कुलकर्णी (समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र), वि. का. ओक, विठ्ठल रामजी शिंदे (बृहन्महाराष्ट्र पुरस्कार), वि. द. घाटे (ललितगद्य), (४७) डॉ. वि.भि. कोलते (संपादित), वि. वा. शिरवाडकर (नाटक), वि. स. खांडेकर (कादंबरी), (५०) पु.ल. देशपांडे (ललितकला आस्वादपर लेखन), (५१) राजर्षी शाहू महाराज (क्रीडा वाङमय), (५२)डॉ. सलीम अली (पर्यावरण).
दूरध्वनी : (020) 24475964 ; (020) 24475963