रमाबाई रानडे | |
---|---|
![]() | |
जन्म: | २५ जानेवारी, इ.स. १८६२ देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू: | २६ एप्रिल, इ.स. १९२४ पुणे |
चळवळ: | स्त्री हक्क, स्त्री शिक्षण, सामाजिक चळवळ |
पती: | महादेव गोविंद रानडे |
रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. त्याच्या जीवनातील शिक्षिका इंग्रजी साठी मिस. हार्फर्ड व सगुणाबाई होत्या
रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.
न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी 'हिंदू लेडीज सोशल क्लब'ची मुंबईमध्ये स्थापना केली. पुण्यातील 'सेवा सदन' या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुण्यात मुलींसाठी 'हुजुरपागा' शाळेची स्थापना केली. त्यांनी आपला जीवनपट 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे. [१]
इ.स. १९०१ मध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या मृत्यूनंतर त्यांनी आपले जीवन पूर्णपणे राष्ट्र्कार्याला अर्पण केले. त्या सतत पुण्याच्या येरवडा येथील मानसिक रुग्णालयाला आणि मध्यवर्ती तुरुंगाला स्वेच्छेने भेट देऊ लागल्या. स्त्री कैद्यांच्या सामुदायिक प्रार्थना सभांना हजर राहून त्यांचे मनोबळ वाढवून जीवनाचा एक नवीन मार्ग दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मनोरुग्णांच्या इस्पितळाच्या कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहून रुग्णालयाच्या समस्यांकडे त्या लक्ष देत असत. याशिवाय, रमाबाई सामाजिक बांदिलकी म्हणून अन्य रुग्णालयांनाही भेट देत, रुग्णांची आपुलकीने चौकशी करत व त्यांच्यासाठी फळे, फुले आणि पुस्तके घेऊन जात असत. रमाबाई बालसुधारगृहांना भेट देऊन मुलांशी गप्पा मारत आणि सणासुदीच्या दिवशी खाऊ आणि मिठाई वाटत असत.
रमाबाईंची दानशूर वृत्ती भौगोलिक सीमा जुमानणारी नव्हती, त्यांनी इ.स. १९१३ मध्ये गुजरात आणि काठेवाड येथील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन दुष्काळपीडितांना मदत केली. आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये त्या आपल्या सेवा सदनच्या कार्यकर्त्यांसोबत आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी आळंदीला जात असत. तेथे सेवा सदनच्या कार्यकर्त्या वारीला आलेल्या स्त्री वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करीत असत. त्यांच्या अशा सामाजिक कार्यांतून समाजसेवेच्या कार्यांत एकूणच स्त्रियांचा सहभाग वाढत गेला. इ.स. १९०४ मध्ये जेव्हा रामकृष्ण गोपाळ भांडारकर, श्री. भाजेकर आणि सामजिक चळवळीतील नेत्यांनी अखिल भारतीय महिला परिषद आयोजित करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी रमाबाईंकडे या कार्याची सूत्रे सपूर्द केली. रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे पहिले अधिवेशन डिसेंबर इ.स. १९०४ रोजी मुंबई येथे भरले होते.
इ.स. १९०८ मध्ये श्री. बी.एम. मलबारी आणि श्री. दयाराम गिडुमल हे, रमाबाईंकडे स्त्रियांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन समाजात रुग्णसेविका निर्माण करण्याची कल्पना घेऊन आले. त्यातूनच मग रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली सेवा सदन, मुंबईची स्थापना झाली. इ.स. १९१५ साली, सेवा सदन, पुणे उदयास आली आणि मग अनेक शाखांमार्फत संस्था विस्तारत गेली. मुलींचे प्रशिक्षण केंद्र, तीन वसतीगृहे असे अनेक उपक्रम सेवा सदनमार्फत राबवले गेले.
इ.स. १९२४ मध्ये, रमाबाईंच्या मृत्यूसमयी पुण्याच्या सेवा सदनमधील विविध उपक्रमांमध्ये १०००हून अधिक महिला प्रशिक्षण घेत होत्या. सेवा सदनचा झपाट्याने झालेला विस्तार आणि प्रसार हा रमाबाईंच्या ध्यासाचेच द्योतक आहे. समाजातील रूढ समजुतींच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन समाजाचे मतपरिवर्तन करून सेवेचे अखंडित व्रत सुरू ठेवण्यातच रमाबाईंच्या जीवनाची इतिकर्तव्यता होती. रमाबाईंच्या आयुष्यातील अजून दोन अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे, स्त्रियांसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची मागणी करण्यासाठी केलेले आंदोलन आणि इ.स. १९२१-२२ मध्ये मुंबई प्रांतात स्थापन केलेली पीडित महिलांची संघटना. रमाबाईंच्या समाजातील अतुलनीय कामगिरीची दखल खुद्द महात्मा गांधीनी घेतली. गांधीनी लिहिलेल्या शोकसंदेशाचा मजकूर : "रमाबाई रानडे यांचा मृत्यू ही राष्ट्राची मोठी हानी आहे". हिंदू विधवांसाठी रमाबाई या मोठा आधारस्तंभ होत्या. त्यांच्या नामांकित पतीच्या सामाजिक चळवळीत एका सच्च्या सहधर्मचारिणीप्रमाणेच त्या नेहमी वागल्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी सामाजिक चळवळीलाच आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले. न्यायमूर्ती रानडे हे एक क्रांतिकारी विचारवंत आणि भारतीय स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेची कळकळ असणारे असे होते. ते त्यासाठी सतत झटत राहिले. रमाबाईंनी सेवा सदनमध्ये आपले आयुष्य ओतले. मनापासून आपल्या सर्व शक्तीनिशी त्यांनी सेवा सदन उभे केले. सेवा सदन ही संपूर्ण भारतातील या धर्तीची एकमेव संघटना आहे." भारतीय डाक आणि तार विभागाने रमाबाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याच्या गौरवाप्रीत्ययर्थ खास पोस्टाचे तिकीट काढले होते.
रमाबाई या आधुनिक स्त्री चळवळीच्या अग्रणी नेत्या होत्या. स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या खंबीर आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
महादेव रानडे हे पुण्यात उपन्यायाधीश होते. अतिशय पारदर्शी न्यायनिवाडा करणारे आणि मानवतावादी दृष्टिकोन असणारे न्यायाधीश असा त्यांचा लौकिक होता. समाजातील वाईट रूढी, परंपरा यांना विरोध करत त्यांनी अस्पृश्यता, बालविवाह आणि सती या प्रथांविरोधात आवाज उठवला. मुंबई प्रांतात पहिला पुनर्विवाह संमत करून तो पार पाडणारे ते प्रथमच. त्यांनी स्त्री शिक्षण आणि समान अधिकाराची मागणी पुढे करण्यासाठी अनेक सार्वजनिक सभा आणि चळवळी उभारल्या. महाराष्ट्रातील विचारवंत मंडळींमध्ये महादेव रानडे हे नाव, त्यांच्या ऐन तिशीमध्येच दाखल झाले.
आपल्या पतीच्या सामजिक आयुष्याचा भाग बनून त्यांची मदत करण्याच्या ध्यासाने रमाबाईंनी शिक्षणाची कास धरली. त्या सर्वप्रथम एक उत्तम विद्यार्थी बनल्या, मग हळूहळू त्या महादेव रानड्यांच्या सचिव झाल्या, आणि शेवटी त्या एक उत्तम सहकारी व मित्र झाल्या. महादेवराव सुरुवातीला रमाबाईंना साधी अक्षरओळख, मराठी वाचन करवून घेत. मग इतिहास, भूगोल, गणित आणि इंग्रजीचेही धडे त्यांनी रमाबाईंना दिले. पुढे रोजचे वर्तमानपत्र ते रमाबाईंना वाचावयास लावून घडलेल्या घटनांवर त्यांच्याशी चर्चा करत. रमाबाईंना इंग्रजी वाङ्मयाची विशेष गोडी निर्माण झाली होती.
रमाबाईंनी स्वतःच्या आयुष्यातील घटना शब्दरूप करून मराठी वाङ्मयाला एक मोठी देणगी दिली आहे. तसेच त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांची धर्मशास्त्रावरील अनेक भाषणे प्रकाशित केली.
रमाबाईंनी सर्वप्रथम जाहीर भाषण नाशिक हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमात केले. रमाबाईंनी मराठी आणि इंग्रजी भाषेवर वाक्नैपुण्य मिळवले होते. त्यांची भाषणे ही अत्यंत साध्या भाषेतली, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी असत. त्यांनी मुंबई मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली. इ.स. १८९३ ते इ.स. १९०१ या काळात त्यांच्या सामाजिक कर्तृत्त्वाचा आलेख हा सतत उंचवणारा होता. त्यांनी हिंदू लेडीज सोशल आणि लिटररी क्लबची मुंबईत स्थापना केली, तसेच महिलांना भाषा, सामान्य ज्ञान, शिवणकाम आणि हस्तकला यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.
पतीच्या निधनानंतरचा काही काळ हा दुःखादायक आणि निराशाजनक होता. त्या मुंबई सोडून पुण्याला परत गेल्या आणि फुले मंडई जवळच्या आपल्या जुन्या वाड्यात राहू लागल्या. सुमारे एक वर्ष त्यांनी एकाकी आयुष्य व्यतीत केले. स्वतःवर लादलेल्या या एकांतवासानंतर त्या सामाजिक आयुष्यात सक्रिय झाल्या आणि त्यांनी भारत महिला परिषदेचे मुंबई मध्ये आयोजन केले. पतीच्या मृत्यूनंतर आयुष्याची २४ वर्षे रमाबाईंनी समाज जागृती आणि सेवा सदन सारख्या पीडित महिलांना सशक्त बनवणाऱ्या सामाजिक चळवळी उभारण्यात वाहून घेतली.
रमाबाई स्त्री शिक्षण, न्याय्य हक्क, समान अधिकार आणि समाज सुधारणेसाठी अविरत झटल्या. त्यांनी स्त्रियांना प्रशिक्षित रुग्णसेवा ही केवळ एक सेवा नव्हे तर उपजिवीकेचे साधन म्हणून स्वीकारण्यास सांगितले. त्या काळी रुग्णसेवा ही व्यावसायिकदृष्ट्या समाजात रूढ नव्हती आणि स्त्रियांसाठी तर ही दारे नेहमीच बंद होती. महिलांना धीर देऊन या क्षेत्रात पुढे आणण्यासाठी त्या विचारत : "तुम्ही तुमच्या आजारी वडील किंवा भावाची सेवा करता ना? सगळे पुरुष रोगी हे आपल्या भावासमान आहेत आणि त्यांची सेवा हे आपले कर्तव्यच आहे." त्यांचे विचार ऐकून अधिकाधिक महिला पुढे आल्या. रुग्णसेवेच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. सेवा सदन मधूनच पहिली भारतीय नर्स समाजात वावरू लागली. समाजाच्या रूढींना झुगारून स्त्रीस्वावलंबनासाठी रुग्णसेवेची दारे उघडून अनेक गरजू महिलांना नवा मार्ग दाखवला. तरुण मुली आणि विधवांसाठी सेवा सदन एक मोठा आधार होता.
सेवा सदनच्या एका वार्षिक समारंभात एका विधवेला बक्षिस जाहीर झाले होते. अळवण नेसलेली ती विधवा जेव्हा पुढे आली तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांनी आवाज केला. हे त्यांचे वागणे रमाबाईंना मुळीच आवडले नाही. समारंभाच्या शेवटी आभाराचे भाषण करताना त्या म्हणाल्या, "तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात पण मी तुम्हाला सुशिक्षित कसे म्हणू? समाजातील अनिष्ट रूढींना बळी पडलेल्या आपल्या भगिनींबद्दल ज्यांच्या मनात साधी माणुसकी नसून त्या केवळ एक थट्टेचा विषय वाटतात त्यांना मी सुशिक्षित कसे मानू? तुमच्यातील प्रत्येकाच्या घरी एखादी अशीच अभागी विधवा असू शकते, ती तुमची बहीण, चुलती, तुमची आत्या किंवा तुमची स्वतःची आई देखील असू शकते. ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही असे वागणार नाही." त्यांचे हे कठोर शब्द उपस्थितांना फटकाऱ्यांसारखे लागले.
त्यांनी बालविवाहाच्या अनिष्ट रूढीविरोधात अविरत मोहीम चालवली. मध्यम वर्गातील अनेक अभागी निराधार महिलांना सेवासदनमार्फत त्यांनी मदत केली. पुण्यातील आपल्या वडिलोपार्जित वाड्यातून सुरू केलेले सेवा सदन हे उत्तरोत्तर वाढतच गेले. रमाबाईंनी जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी फिजी आणि केन्या मधील भारतीय मजुरांच्या समस्यांवर देखील आवाज उठवला.
समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्या कार्याचा गौरव झाल्यानंतर देखील आपण केवळ आपल्या पतीची सावली बनण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्या नम्रपणे सांगत असत. रमाबाई रानडे यांनी १९ व्या शतकामध्ये स्त्री शिक्षणावर आपली स्वतंत्र मते व्यक्त करून स्त्री सुधारणा करण्यास मोलाची मदत केली.
(ताईसासूबाईं) यांचे निधन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |