राडा अकबर (पश्तो भाषा|पश्तु:رادا اکبر; जन्म :१९८८), ह्या एक अफगाण वंशातील वैचारिक कलाकार आणि छायाचित्रकार आहेत. त्यांच्या कलाकृतीचा केंद्र बिंदू हा स्त्रियांवरील अत्याचाराचा निषेध करणे आणि आपल्या कलाकृती आणि फोटोग्राफिक पोर्ट्रेटद्वारे जगासमोर अफगाण महिलांचे सामर्थ्य मांडणे हा आहे.[१][२] बीबीसीच्या २०२१ मधील १०० सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक म्हणून अकबर यांची निवड झाली होती.[३][४]
अकबर यांचा जन्म १९८८ रोजी अफगाणिस्तानमध्ये झाला होता.[५] इ.स. १९७८ ते १९९२ पर्यंत चाललेल्या सोव्हिएत-अफगाण युद्धादरम्यान बॉम्ब हमल्या पासून बचाव करण्यासाठी अनेकदा अकबर कुटुंब तळघरात रहात असे. अशा वातावरणात रादा यांचे बालपण गेले. याशिवाय त्यांचे कुटुंब सहा वर्षे पाकिस्तानात देखील वास्तव्यास होते.
इ.स. २०१३ मध्ये, अकबर यांनी फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याच सोबत काबूलमध्ये आधुनिक कलादालन सुरू केले. २०१८ ते २०२१ पर्यंत, अकबर यांनी ८ मार्च, जागतिक महिला दिनाच्या स्मरणार्थ "अबरजानन" (अर्थात "सुपरवुमन") नावाचे एक प्रदर्शन आयोजित केले.[५][६][७] या प्रकल्पातील कलाकृतीत — उत्कृष्टपणे तयार केलेले अंगरखे हे, कवी, पर्वतारोहक, दूरचित्रवाणी सादरकर्ते, राजेशाही, राजकारणी आणि संगीतकार यांचे प्रतिनिधित्व करणारे होते. सदरिल वस्त्र हे अफगाणिस्तानच्या पितृसत्ताक संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.[८][७]
इ.स. २०२१ मध्ये अकबर यांना प्रिन्स क्लॉज सीड अवॉर्ड नावाचा पुरस्कार मिळाला.[९] सप्टेंबर २०२१ मध्ये, अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर परतले. यापूर्वीच अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडले होते. तेव्हा फ्रेंच सरकारने आश्रय दिलेल्या अफगाणी आश्रित लोकांपैकी ती एक होती.[१०] तिला फ्रेंच दूतावासातून बसने विमानतळावर हलवण्यात आले आणि पॅरिसमध्ये पाठवण्यात आले. इथे अकबर यांना COVID-19 मुळे अलगीकरणात काहीकाळ ठेवले गेले होते.[१][११]
रादा यांचे २०२२ मधील काम हे बिफोर सायलेन्स: अफगाण आर्टिस्ट इन एक्साइल द्वारे PEN अमेरिकेच्या आर्टिस्ट्स ॲठ रिस्क कनेक्शन आणि आर्ट ॲट अ टाइम लाइक नामक प्रदर्शनाचा एक भाग म्हणून होते.[१२][१३][१४]