राहीबाई सोमा पोपेरे | |
---|---|
जन्म |
१९६४ कोंभाळणे अहमदनगर जिल्हा |
निवासस्थान | कोंभाळणे अहमदनगर जिल्हा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | अशिक्षित |
पेशा | शेतकरी |
धर्म | हिंदू |
पुरस्कार |
|
राहीबाई पोपेरे (जन्म : इ.स. १९६४) या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली पद्मश्री पुरस्कार दिला.[१]
राहीबाईसह घरात एकूण आठ भावंडे होती व राहीबाई हे त्यांच्या आईचे पाचवे अपत्य होत्या. अल्पवयात त्यांच्या आईचा मृत्यू झाला. राहीबाईंचे वडील शेतकरी होते व त्यांची चार-पाच एकर कोरडवाहू शेती होती. सासरदेखील शेतकरी कुटुंबातील होते. तेथेही कोरडवाहू शेती होती. [२]
अधिक उत्पादनासाठी शेतीमध्ये हायब्रीड बियाणे वापरात होते पण त्यांचा नातू आजारी पडू लागला तेव्हा मूळ कारणाचा शोध घेतला आणि लक्षात आले की सेंद्रिय बियाणे वापरली तर आरोग्य उत्तम राहते. आणि म्हणून तसा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाल्यावर कार्याला सुरुवात झाली. बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. त्यात बाइफ संस्थेचेही साहाय्य लाभले. त्यांनी देशी बियाणाची बँक सुरू केली. रानभाज्यांच्या बियासुद्धा या बँकेमार्फत पुरविल्या जातात.[२]
राहीबाई मूळच्या याच गावच्या. राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बँकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला. बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.[३]
राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.[ संदर्भ हवा ]
राहीबाईंनी कळसूबाई शिखर परिसरातील जैवविविधता जपण्यासाठी 'कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन समिती'ची स्थापना केली.[२] नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही बियाणांचे जतन व संवर्धन त्यांनी केले आहे.
त्यांच्या प्रेरणेमुळे आज नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे चारशे एकर जमिनीवर गावरान वाणाची शेती केली जाते.[२]
महाराष्ट्राचे तत्कालीन महसूलमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी बीजबँकेच्या नवीन इमारतीस साहाय्य पुरविले.[२]