शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या "नवयुग’ मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातीलहिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे [१]. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. [२] ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.
मंचरच्या कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ’शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार. २०१५ साली हा पुरस्कार लेखक गोविंद गणेश अत्रे यांना मिळाला.
कवयित्री प्रज्ञा दया पवार यांना मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा "कवयित्री शांता शेळके पुरस्कार' दिला गेला (२००८)
सुधीर मोघे यांनाही हा पुरस्कार मिळाला होता. (२००७)
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर विभागातर्फे दिला जाणारा शांताबाई शेळके साहित्य पुरस्कार. हा पुरस्कार २०१४ साली 'पानिपत'कार विश्वास पाटील यांना मिळाला होता.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ललित लेखक व निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांना शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता. (२०१३)
कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांनाही हा शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता. (२०१२)