शेरीन भान ( २० ऑगस्ट, इ.स. १९७६) या भारतीय वार्ताहर आणि वृत्तनिवेदिका आहेत. सीएनबीसी टीव्ही १८ (CNBC-TV18) या दूरदर्शन वाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादिका म्हणून त्या कार्यरत आहेत. उदयन मुखर्जी यांच्यानंतर १ सप्टेंबर २०१३ पासून शिरीन यांनी हा पदभार स्वीकारला.[१]
शिरीन यांचे शिक्षण काश्मीरमधील केंद्रीय विद्यालय व दिल्लीमधील एर फोर्स बाल भारती स्कूल येथे झाले. दिल्लीच्याच सेंट स्टीफन महाविद्यालयातून त्यांनी तत्त्वज्ञान या विषयात पदवी संपादन केली असून आपले पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातून (फिल्म अँड दूरचित्रवाणी या विषयात) विशेषत्वाने पूर्ण केले आहे.[२]
शेरीन यांना कामाचा १५ वर्षांचा अनुभव आहे. यातील १४ वर्षे त्यांनी भारताच्या व्यावसायिक आणि धोरणात्मक उपक्रमांशी संबंधित वार्ता आणि कार्यक्रम यासाठी काम केले आहे. करण थापर यांच्या वाहिनीसाठी संशोधक वार्ताहर म्हणून त्यांनी आपले काम सुरू केले.[३] यूटीव्ही न्यूजच्या चालू घडामोडी या विभागात त्यांनी काम केले तसेच वुई द पीपल हा स्टारटीव्ही साठी केलेला त्यांचा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. डिसेंबर २००० साली त्यांनी CNBC-TV18 या वाहिनीसाठी काम सुरू केले. त्यांनी भारताच्या अर्थक्षेत्रातील विशेष कथा आणि त्यांच्या माहितीपर मालिका तयार केल्या तसेच भारतीय आणि परदेशी प्रसिद्ध राजकीय नेते, उद्योजक यांच्या मुलाखतीही घेतल्या. व्यावसायिक जगाशी संबंधित कार्यक्रमांच्या निर्मिती त्या गेली १३ वर्षे सातत्याने करीत आहेत. या कार्यक्रमाला 'Best Business Talk Show' असा पुरस्कारही मिळाला आहे.[२]