श्रीधर वेंबु | |
---|---|
जन्म |
श्रीधर वेंबु १९६८ तंजावर, तामिळनाडू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वांशिकत्व | तामिळ |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | प्रिन्स्टन विद्यापीठ (PhD) |
मालक | झोहो कॉर्पोरेशन[१] |
धर्म | हिंदू |
जोडीदार | प्रमिला श्रीनिवासन |
पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार (२०२१) |
श्रीधर वेंबु (जन्म:१९६७) हे एक भारतीय अब्जाधीश व्यावसायिक आणि झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.[२] फोर्ब्सच्या मते, २०२० पर्यंत US$२.५ अब्ज एवढी संपत्ती असलेले ते जगातील ५९ वे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. [३] इ.स. २०२१ मध्ये त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वेंबूचा जन्म १९६८ मध्ये तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील एका छोट्या गावातील जमीन मालकांच्या तामिळ कुटुंबात झाला.[४][५] त्यांनी १९८९ मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था चेन्नई (आय.आय.टी. मद्रास) येथून विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग)मध्ये पदवी प्राप्त केली आणि न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन विद्यापीठातून एमएस आणि पीएचडी पदवी मिळविली.[४]
वेम्बूने सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये जाण्यापूर्वी सॅन दिएगो, कॅलिफोर्निया येथे 'क्वालकॉम'साठी वायरलेस अभियंता म्हणून काम करत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी सॅन जोस आणि प्लेझेंटन येथे वास्तव्य केले होते.[४]
इ.स. १९९६ मध्ये, वेंबू यांनी आपल्या दोन भावांसह, नेटवर्क उपकरण पुरवठादारांसाठी AdventNet नावाचे सॉफ्टवेर डेव्हलपमेंट हाऊस स्थापन केले.[४][६] त्यानंतर ग्राहक संबंध व्यवस्थापन सेवांना SaaS (आज्ञावली सेवा) समर्थन पुरवण्यावर लक्ष केंद्रित करून कंपनीचे २००९ मध्ये 'झोहो कॉर्पोरेशन' असे नामकरण करण्यात आले.[४][२] इ.स. २०२० पर्यंत, त्यांचा कंपनीत ८८ टक्के हिस्सा होता. फोर्ब्सने त्यांची एकूण संपत्ती USD $2.44 अब्ज असल्याचा अंदाज वर्तवला आहे.[२][७] इ.स. २०२१ मध्ये, श्रीधर वेंबू यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आली.[८]
श्रीधर वेंबू हे भारतातील शहरी भागातून ग्रामीण खेड्यांमध्ये सॉफ्टवेर आणि उत्पादन विकास कार्ये घेऊन जाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः त्यांच्या कंपनीने, झोहोने आपली कार्यालये ग्रामीण मथालमपराई, तेनकासी जिल्हा, तामिळनाडू आणि उपनगरी रेनिगुंटा, आंध्र प्रदेश येथे स्थापन केली.[४][९] यावेळी ते सिलिकॉन व्हॅली तुन मथलमपराई येथे विस्थापित झाले.[१०]
इ.स. २००४ मध्ये, त्यांनी औपचारिक विद्यापीठ शिक्षणाचा पर्याय म्हणून ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यावसायिक सॉफ्टवेर विकास शिक्षण देण्यासाठी झोहो शाळाची स्थापना केली.[११] कंपनीच्या एका निवेदनात असे म्हणले आहे की त्यांच्या १५ ते २० टक्के अभियंत्यांना महाविद्यालयीन पदवी नाही, परंतु त्यांनी झोहो शाळांमधून व्यावसायिक शिक्षण घेतले आहे.[४] इ.स. २०२० मध्ये, त्यांनी मोफत प्राथमिक शिक्षणावर केंद्रित "ग्रामीण शाळा स्टार्टअप"ची घोषणा केली.[१०][६]
जानेवारी २०२० मध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित एका उच्च-प्रोफाइल कार्यक्रमात उपस्थिती बद्दल वेंबूवर टीका झाली.[१२][१३][१४] वेंबूने आपला सहभाग हा त्यांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार आहे असे म्हणले.[१५][१६][१७]