श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी (जन्म : १९५६) हेे एक मराठी खगोल भौतिकशास्त्रज्ञ कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत काम करतात. कुलकर्णी यांचा जन्म दक्षिण महाराष्ट्रातल्या कुरुंदवाड या संस्थानी गावात झाला. त्यांचे शिक्षण कर्नाटकात हुबळी येथे झाले. त्यानंतर दिल्लीच्या आयआयटीतून ते १९७८ मध्ये भौतिकशास्त्र विषयात एमएस झाले. १९९० मध्ये एका उन्हाळी वर्गात बंगलोर येथे खगोलशास्त्र या विषयावरील व्याख्याने ऐकून त्यांना खगोलशास्त्रात रस निर्माण झाला.. पुढे १९८३मध्ये डॉक्टरेट मिळविल्यानंतर ते बर्कले येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्राध्यापक झाले. इंटरस्टेलर मेडियम पल्सार, ब्राऊन ड्वार्फ (बटू तारे), सॉफ्ट गॅमा रे रिपीटर्स, गॅमा किरणांचे स्फोट, ऑप्टिकल ट्रान्झियंट्स हे त्यांचे संशोधनाचे विषय होत.
श्रीनिवास कुलकर्णी यानंतर, २००१ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो झाले. या संस्थेचे भारतीय फेलो केवळ दहा ते अकरा आहेत, त्यांपैकी कुलकर्णी एक आहेत. २००३ मध्ये ते नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य झाले. सध्या कुलकर्णी हे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत 'स्पेस इन्फरनोमेट्री मिशन'चे सदस्य असून पालोमार व केक येथील प्रकाशीय वेधशाळांचे संचालक आहेत. रेडिओ लहरींवर काम करणारे खगोल भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी सुरुवातीला ग्लोब्युलर क्लस्टर पल्सरच्या (स्पंदक तारा) शोधात काम केले होते.
कालटेकच्या स्पेस इंटरफेरोमेट्री मिशनचे ते सदस्य असून त्याचा उपयोग पृथ्वी निकटचे ग्रह व ताऱ्यांमधील अंतरे मोजण्यासाठी होतो. ‘फ्युचर’ प्रवर्गात त्यांची आश्वासक वैज्ञानिक म्हणून डॅन डेव्हिड या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. (२०१७)
याशिवाय, रॉयल सोसायटी ऑफ लंडन, युनायटेड स्टेट्स अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल नेदरलँड्स अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस या चार नामांकित संस्थांचेही ते सदस्य आहेत.
श्रीनिवास कुलकर्णी हे इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचे भाऊ आहेत. त्यांचे आईवडील व्यवसायाने डॉक्टर आहेत.
भारताच्या पंतप्रधानांनी श्रीनिवास कुलकर्णी यांना 'ब्रेन-गेन'सदृश योजनेनुसार भारतामध्ये येऊन बारा महिने कुठलेही संशोधन करण्यासाठी 'जवाहरलाल नेहरू फेलोशिप' दिली आहे.