संयुक्त महाराष्ट्र चळवळ

हुतात्मा स्मारक,मुंबई

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवारबिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

पूर्वार्ध

[संपादन]

ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषतः नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.

इ. स. १९३८ रोजी पटवर्धन [ संदर्भ हवा ]इ. स. १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला[ संदर्भ हवा ]. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हणले. इ. स. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.

इ. स. १९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेत स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीला पाठिंबा होता. या चळ्वळीला पाठिंबा दर्शविण्याकरिता अनेक ठिकाणी सभा त्यांनी घेतल्या होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतील एक घटक पक्ष होता.. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली.

दार कमिशन व जे.व्ही.पी कमिटी

[संपादन]

डिसेंबर इ. स. १९४८ रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. जे.व्ही.पी कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे असे अहवालात म्हणले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले.

फाजलअली आयोग

[संपादन]

डिसेंबर इ. स. १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ. स. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी 'आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.

चळवळीस सुरुवात

[संपादन]
महाराष्ट्र राज्य

या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हणले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्याचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

२० नोव्हेंबर इ. स. १९५५ मोरारजी देसाईस.का.पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी 'पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल' अशी मुक्ताफळं उधळली. लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर इ. स. १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु इ. स. १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना

[संपादन]

१ नोव्हेंबर इ. स. १९५६ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भमुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु या द्विभाषिकाचे महाराष्ट्रगुजरात येथेही कडाडून विरोध झाला. या समितीने १९५७ सालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गाधींने नेहरूंचे मन वळवले. द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली.[] तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.[] मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरडांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना १९६० सालच्या कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजीझाली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते दिल्लीहून आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

हुतात्म्यांची नावे

[संपादन]

२१ नोव्हेंबर इ. स. १९५५चे हुतात्मे[]

१] सिताराम बनाजी पवार

२] जोसेफ डेव्हिड पेजारकर

३] चिमणलाल डी. शेठ

४] भास्कर नारायण कामतेकर

५] रामचंद्र सेवाराम

६] शंकर खोटे

७] धर्माजी गंगाराम नागवेकर

८] रामचंद्र लक्ष्मण जाधव

९] के. जे. झेवियर

१०] पी. एस. जॉन

११] शरद जी. वाणी

१२] वेदीसिंग

१३] रामचंद्र भाटीया

१४] गंगाराम गुणाजी

१५] गजानन ऊर्फ बंडू गोखले

१६] निवृत्ती विठोबा मोरे

१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

१८] बालप्पा मुतण्णा कामाठी

१९] धोंडू लक्ष्मण पारडूले

२०] भाऊ सखाराम कदम

२१] यशवंत बाबाजी भगत

२२] गोविंद बाबूराव जोगल

२३] पांडूरंग धोंडू धाडवे

२४] गोपाळ चिमाजी कोरडे

२५] पांडूरंग बाबाजी जाधव

२६] बाबू हरी दाते

२७] अनुप माहावीर

२८] विनायक पांचाळ

२९] सिताराम गणपत म्हादे

३०] सुभाष भिवा बोरकर

३१] गणपत रामा तानकर

३२] सिताराम गयादीन

३३] गोरखनाथ रावजी जगताप

३४] महमद अली

३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे

३६] देवाजी सखाराम पाटील

३७] शामलाल जेठानंद

३८] सदाशिव महादेव भोसले

३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे

४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर

४१] भिकाजी बाबू बांबरकर

४२] सखाराम श्रीपत ढमाले

४३] नरेंद्र नारायण प्रधान

४४] शंकर गोपाल कुष्टे

४५] दत्ताराम कृष्णा सावंत

४६] बबन बापू भरगुडे

४७] विष्णू सखाराम बने

४८] सिताराम धोंडू राडये

४९] तुकाराम धोंडू शिंदे

५०] विठ्ठल गंगाराम मोरे

५१] रामा लखन विंदा

५२] एडविन आमब्रोझ साळवी

५३] बाबा महादू सावंत

५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर

५५] विठ्ठल दौलत साळुंखे

५६] रामनाथ पांडूरंग अमृते

५७] परशुराम अंबाजी देसाई

५८] घनश्याम बाबू कोलार

५९] धोंडू रामकृष्ण सुतार

६०] मुनीमजी बलदेव पांडे

६१] मारुती विठोबा म्हस्के

६२] भाऊ कोंडीबा भास्कर

६३] धोंडो राघो पुजारी

६४] हृदयसिंग दारजेसिंग

६५] पांडू माहादू अवरीरकर

६६] शंकर विठोबा राणे

६७] विजयकुमार सदाशिव भडेकर

६८] कृष्णाजी गणू शिंदे

६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले

७०] धोंडू भागू जाधव

७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे

७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर

७३] करपैया किरमल देवेंद्र

७४] चुलाराम मुंबराज

७५] बालमोहन

७६] अनंता

७७] गंगाराम विष्णू गुरव

७८] रत्नू गोंदिवरे

७९] सय्यद कासम

८०] भिकाजी दाजी

८१] अनंत गोलतकर

८२] किसन वीरकर

८३] सुखलाल रामलाल बंसकर

८४] पांडूरंग विष्णू वाळके

८५] फुलवरी मगरू

८६] गुलाब कृष्णा खवळे

८७] बाबूराव देवदास पाटील

८८] लक्ष्मण नरहरी थोरात

८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

९०] गणपत रामा भुते

९१] मुनशी वझीऱअली

९२] दौलतराम मथुरादास

९३] विठ्ठल नारायण चव्हाण

९४] देवजी शिवन राठोड

९५] रावजीभाई डोसाभाई पटेल

९६] होरमसजी करसेटजी

९७] गिरधर हेमचंद लोहार

९८] सत्तू खंडू वाईकर

—नाशिक --

९९] गणपत श्रीधर जोशी

१००] माधव राजाराम तुरे(बेलदार)

-- बेळगांव --

१०१] मारुती बेन्नाळकर

१०२] मधूकर बापू बांदेकर

१०३] लक्ष्मण गोविंद गावडे

१०४] महादेव बारीगडी

-- निपाणी --

१०५] कमलाबाई मोहिते

-- मुंबई—

१०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर

१०७] शंकरराव तोरस्कर

१०८] बंडु गोखले

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीविषयी पुस्तके

[संपादन]
  • महाराष्ट्र : एका संकल्पनेचा मागोवा (माधव दातार)
  • मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा (ऐतिहासिक, लेखिका - शिरीष पै)
  • संयुक्त महाराष्ट्र काल आणि आज (संपादक - प्रा. भगवान काळे)
  • संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहिरांचे योगदान, लेखिका - सुहासिनी देशपांडे, परिवर्तन प्रकाशन, पुणे.

संदर्भ

[संपादन]
  • नीरा आडारलर व मीना मेनन, कथा मुंबईच्या गिरणगावाची, मौज प्रकाशन, २००७, ISBN 81-7486-649-3
  1. ^ य.दि.फडके, पॉलिटिक्स अँड लँग्वेज, हिमालय पब्लिशिंग हाऊस, १९७९
  2. ^ लालजी पेंडसे, महाराष्ट्राचे महामंथन, अभिनव प्रकाशन, इ. स. १९६१
  3. ^ संयुक्त महाराष्ट्र काल आणि आज : संपादक प्रा. भगवान काळे

बाह्य दुवे

[संपादन]