सीतेची वेणी म्हणजे रॅन्कोस्टायलिस रेटुसा (याला फॉक्सटेल ऑर्किड देखील म्हणतात) हे एक ऑर्किड आहे. त्याची फुले एखाद्या घोसाप्रमाणे दिसतात. एका घोसात १०० पेक्षा जास्त गुलाबी ठिपके असलेली पांढऱ्या रंगाची फुले असतात. या रोपाचे खोड लहान, कडक आणि वर चढणारे असते. त्यावर साधारण १२ वळलेली, मांसल, खोलवर चिकटलेली, पिवळसर, आणि अक्षीय पाने असतात आणि त्यावर ६० सेमी (२४ इंच) लांबीचे गच्च फुले असलेले, दंडगोलाकार घोस येतात. हा फुलोरा हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो. वसंत ऋतूच्या सुरुवातीला आसाममध्ये साजरा केल्या जाणाऱ्या बिहू सणाच्या वेळी नृत्य सादर करताना आसामी स्त्रिया ही फुले केसात माळतात.[१]
ही वनस्पती जंगलात किंवा जंगलाच्या सीमेवर ३००-१५०० मीटर उंचीवर (९८०–४९२० फूट) वृक्षांच्या खोडांवर उगवणारे एक बांडगुळ आहे. ही वनस्पती हवेतील बाष्प शोषून घेते आणि प्रकाश संश्लेषणाने आपले अन्न तयार करत असल्यामुळे ती बांडगुळ असली तरीही परोपजीवी नाही. ती इपिफाईट वर्गात गणली जाते. ही वनस्पती भूतान, कंबोडिया, चीन (गुईझहू, युनान), भारत, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, फिलीपिन्स, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये आढळते.[२]
भारतात, ही वनस्पती ईशान्य भारत, ओरिसा आणि आंध्र प्रदेशात सर्वात जास्त आढळते. आंध्र प्रदेशात या वनस्पतीला चिंताराणामू या तेलुगू नावाने ओळखले जाते. सध्या ही वनस्पती भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. रॅन्कोस्टायलिस रेटुसा ही अरुणाचल प्रदेश आणि आसाम आणि श्रीलंकेच्या उवा प्रांताचे राज्य फूल म्हणून ओळखली जाते.
या वनस्पतीला वर्षभर नियमित पाण्याची आणि खतांच्या वापराची आवश्यकता असते, मात्र पाने सतत ओली राहिली तर ती मरतात. या झाडाला अप्रत्यक्ष प्रकाश मानवतो. सामान्यपणे वसंत ऋतूच्या शेवटी याला फुले येतात.[३]
केरळ राज्यातील मलबार जिल्ह्यात दमा आणि क्षयरोगावरील उपचारासाठी या वनस्पतीपासून बनवलेल्या औषधाचा वापर केला जातो आणि गोळे येणे, अपस्मार, चक्कर, धडधड, मूतखडे आणि मासिक पाळीच्या विकारांसाठीसुद्धा याचा उपयोग केला जात असे. आसाममध्ये जखम, कट आणि जखमांवर उपचार करण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जात असे. भारत आणि नेपाळमध्ये ही वनस्पती मॉईस्चरायझर म्हणून वापरली जाते. रसना या नावाने या वनस्पतीचे मूळ संपूर्ण भारतीय उपखंडात संधिवातावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.[४]
आसाममध्ये, ही वनस्पती कोपौ फूल म्हणून लोकप्रिय आहे आणि ती बिहू नर्तकांच्या पोशाखांचा अविभाज्य भाग आहे. ही वनस्पती प्रेम, प्रजनन व आनंद यांचे प्रतीक मानली जाते आणि त्यामुळेच ही फुले पारंपारिक आसामी विवाह सोहळ्यामधील एक अत्यावश्यक घटक आहेत. या राज्यात या फुलांचे सौंदर्य, उपयोग आणि व्यापक सांस्कृतिक महत्त्व एवढे आहे की, हे सुंदर वन्य फूल बहुतेक सर्व आसामी कुटुंबांद्वारे आपल्या बागांमध्ये आवडीने लावले जाते. आसामचे राज्य फूल म्हणून त्याची निवड सार्थच आहे.
|isbn=
value: invalid character (सहाय्य).